नानेटी हा एक बिनविषारी साप असून तो झाडांवर राहतो. त्याला वृक्षसर्प असेही म्हणतात. हा साप कोल्युब्रिडाई सर्पकुलाच्या डिप्सॅडोमॉर्फिनी उपकुळातील आहे. याचे शास्त्रीय नाव ड्रायोफिस मिक्टेरिझान्स असे आहे. ड्रायोफिस या वंशाच्या सहा-सात जाती भारतात आढळतात. भारतात सर्वत्र आणि श्रीलंका, ब्रम्हदेश थायलंडमध्ये हा आढळतो. जंगलात आणि डोंगराळ प्रदेशांत याचा प्रामुख्याने वावर आहे.
याची लांबी साधारणपणे चार फुटापर्यंत असते,पण यापेक्षाही जास्त लांबीचे नानेटी आढळतात. शरीर अतिशय सडपातळ असून, याचे शेपूट इतर सापांच्या शेपटापेक्षा जास्त लांब असते. याच्या शरीरावर मऊ खवले असतात. पाठ तपकिरी रंगाची असून पाठीवरील प्रत्येक खवल्याला निळसर काळ्या रंगाची कडा असते. तसेच डोक्यापासून शेपटापर्यंत एक रुंद व लांबलचक पट्टा पाठीवरून गेलेला असतो. अंगावरील पट्टा काळा किंवा तपकिरी असतो. पोटाकडील बाजू पिवळसर असते. डोके चपटे असून डोळे मोठे असतात. नानेटीचे डोके बरेच लांबट असून मानेजवळ रुंद व पुढे बरेच निमुळते होत गेलेले असते. तोंडाच्या टोकावर लांबट व मांसल भाग असून ते चोचीसारखे दिसते, हे या सापाचे विशेष लक्षण समजता येईल. वरचा ओठ पिवळा असतो. प्रौढ नानेटी आणि पिले एकसारखीच दिसतात. याची मादी एकावेळी ६-७ अंडी घालते. अंडी लांबट आकाराची असतात. ४-६ आठवड्यांनी अंड्यांमधून पिले बाहेर येतात. जन्मलेली पिले साधारणत: १५ सेंमी. लांबीची असतात.
नानेटी बहुधा झुडपे व झाडांवर आणि भाताच्या खाचरांच्या कडेने राहतो. हा साप दिनचर असून उन्हाळ्यात अत्यंत चपळपणे हालचाली करतो. झाडावर तो वेगाने चढतो. धोक्याची जाणीव झाल्यानंतर मान आणि शरीराचा पुढील भाग विशिष्ट पद्धतीने हलवतो. त्यास पकडल्यास २-३ वेळा चावण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे १०-२० मीटर उंचीवरून तो सहजपणे खाली उडी मारतो. धोका दिसल्यानंतर लपून राहण्याचा प्रयत्न करत नाही. लहानसहान पक्षी आणि सरडे हे त्याचे मुख्य अन्न आहे. तसेच तो गवताने शाकारलेल्या घराच्या छतांमधील पाली व उंदीर पाठलाग करून त्यांना खातो.
हा दिवसा हिंडणारा साप असून झाडाझुडपांमध्ये तो नेहमी दिसतो. उंच झाडांवर तो सहज चढतो. नारळीच्या शेंड्यावर तो अनेकदा दृष्टीस पडतो, त्याच्या हिरव्या करड्या रंगामुळे झाडांवर तो लवकर दिसून येत नाही. हा साप फार चपळ आहे. शेपटीने झाडाच्या फांदीला घट्ट विळखे घालून तो भक्ष्यांवर नजर ठेवतो. लोंबत्या स्थितीत तो एखाद्या वेलासारखा दिसतो. यामुळे एखादा बेसावध पक्षी किंवा सरडा त्याच्या तडाख्यात सापडतो. नानेटी सामान्यतः उंदीर, सरडे व पक्षी खाऊन हा राहतो, पण कधीकधी बेडूक आणि इतर सापदेखील तो खातो.
शत्रूला भीती दाखविण्याकरिता हा आपले शरीर फुगवतो, डोके वर उचलतो व चावा घेण्यासाठी आपले तोंड उघडतो. या स्थितीत तो भयानक दिसतो. इतर साप फक्त दंश करण्याच्या वेळीच आपले तोंड उघडतात.
महाराष्ट्रात नानेटीला काही भागात लाल धामण असेही म्हणतात. नानेटी बाबत लोकांची अशी समजूत आहे की, तो माणसाच्या डोळ्यावर चावतो,महाराष्ट्रात ही अशी एक समजूत प्रचलित आहे की, हा साप माणसाच्या टाळूला चावतो. पण या सगळ्या गैरसमजातून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. या सापाची शेपटी लांब आणि निमुळती असल्याने इंग्रजीत त्याला व्हिप स्नेक असेही म्हणतात.
न्युज अनकट प्रतिनिधी – गुरुराज पोरे.