डुरक्या घोणस हे नाव ऐकल की हा विषारी साप वाटतो, कारण याच्या नावात घोणस आहे. आणि घोणस हा विषारी असतो. पण डुरक्या घोणस हा बिनविषारी साप आहे. हा साप भारतात सगळीकडे आढळतो. तसा शांत पण चिडला की जोरात चावतो. बिनविषारी असल्याने शरीरावर छोट्याशा जखमेशिवय, त्याच्या चावण्याचा कोणताही परिणाम होत नाही. रेताड मातीत राहणे याला आवडते. आणि भक्ष्याला आवळून मारतो म्हणून याला इंग्रजीत sand boa म्हणतात. जमिनीत खोल नसणारी बिळे करुन त्यांत हा राहतो. हा मैदानी ओसाड प्रदेशात त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी फार पाऊस पडतो आणि दाट जंगल असते अशा डोंगरातही म्हणजे पश्चिम घाटातही तो आढळतो.
हा एक साप जाडजूड साप असून त्याला डूरक्या कांडर असेही म्हणतात. हा बोइडी सर्पकुलातल्या बोइनी उपकुलातील असून, अजगराच्या फॅमिलीतला आहे. याचे स्वरुप आणि बऱ्याच सवयी अजगरासारख्या आहेत. याचे शास्त्रीय नाव एरिक्स कोनिकस असे आहे. एरिक्स वंशात जरी एकंदर सात जाती असल्या तरी त्यांपैकी फक्त दोनच भारतात आढळतात. हा साप अंडी घालीत नाही मादीच्या पोटातून जिवंतच पिल्ले बाहेर पडतात.
डुरक्या घोणसची लांबी अडीच फुटापर्यंत असून शरीर जाड असते, शेपूट अतिशय आखूड, एकदम निमुळते झालेले खरखरीत असते. पाठीकवर पिवळसर तपकिरी किंवा गर्द तपकिरी रंगाचे मोठे ठिपके असतात. काही वेळा यांचा रंग काळसर आढळतो, पाठीवर करडया रंगाचे आडवे पट्टे असतात. पोट फिक्कट पिवळया रंगाचे असते. मान नसल्यामुळे डोके शरीराला जोडलेले असते. तोंड पुढे आलेले असून त्याचा उपयोग जमिनीत बिळे करण्याकरिता होतो. डोळे लोखंडी सिसाळी सारखे, फार बारीक व बाहुली उभी असते. नाकपुडया चिरेसारख्या असतात.
डुरक्या घोणस हा दिसायला उग्र असतो पण तो अतिशय सुस्त साप आहे. त्याच्या सगळया हालचाली मंद असतात. पुष्कळदा आपले डोके अंगाखाली लपवून किंवा शरीराचा बहुतेक भाग रेताड मातीत खुपसून तो पडून राहतो. उंदीर, खारी, सरडे, बेडूक हे त्याचं मुख्य भक्ष आहे. भक्ष्याभोवती शरीराचा विळखा घालून तो घट्ट आवळून त्याला मारतो आणि ते मेल्यावरच गिळतो. कधीकधी चवताळल्यावर तो कडकडून चावतो, पण हा पूर्णपणे बिनविषारी आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.