कवड्या या बिनविषारी सापाचे शास्त्रीय नाव लायकोडॉन ऑलिक्स आहे. इंग्रजी मध्ये याला common wolf snake म्हणतात. हा पाली-सरडे झुरळ खाण्यासाठी मानवी वस्ती जवळ येतो. हा साप रंगाने गडद तांबडा असतो. त्यावर पांढऱ्या रंगाच्या आडव्या पट्ट्या असतात त्यामुळे कवड्याची माळ असल्याप्रमाणे भासते. त्यावरूनच याला ‘कवड्या’ नाव पडले आहे. याचा जबडा लांडग्यांच्या जबड्यासारखा दणकट असून भक्ष्यावरची पकड मजबूत असते. म्हणून याला इंग्रजी मध्ये wolf snake म्हणतात. हा साप इतर सापांच्या तुलनेत जास्त आढळून येतो. दिसायला थोडा मण्यार सारखा असल्यामुळे लोक गोंधळात पडतात.
हा साप भारतात आणि श्रीलंकेमध्ये सगळीकडे आढळतो शिवाय अंदमान, मलाया, इंडो-चायना आणि फिलिपीन्स बेटांतही तो सापडतो. सपाट प्रदेशांत तो सगळीकडे आढळत असला तरी, जास्त उंचीवरच्या भागात हा सापडत नाही. कवड्या हा शहरी साप म्हणून ओळखला जातो. घराभोवतालच्या आवारात किंवा बागेत, खुद्द घरात व गुरांच्या गोठ्यात तो पुष्कळदा दृष्टीस पडतो. दाट लोकवस्तीच्या जागीही तो आढळतो. हा साप निशाचर असल्यामुळे दिवसा एखाद्या आडोशाच्या जागी – पडीक भिंतीतल्या भेगा, दगड आणि विटा यांचे ढीग, गोठ्यातील चाऱ्याचे ढिगारे, जमिनीतली बिळे इत्यादींमध्ये-लपून बसतो आणि रात्री भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. उंदीर, सरडे, पाली हे या सापाचे प्रमुख खाद्य आहे.
सरासरी याची लांबी ६०-७५ सेंमी असते. कवड्या सापाचा रंग तपकिरी-फिक्कट तपकिरी रंगापासून तो गर्द तपकिरी रंगापर्यंत असतो. क्वचित काळ्या रंगाचा एखादा साप आढळतो. पाठीवर पांढुरक्या किंवा पिवळसर पांढऱ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. मानेभोवती याच रंगाचे वलय असते. आडवे पट्टे डोक्याजवळ सुरू होतात पुढच्या भागात ते अगदी स्पष्ट असतात, पण मागच्या बाजूकडे क्रमाक्रमाने अस्पष्ट होत जाऊन शेपटीच्या टोकाकडे ते पूर्णपणे नाहीसे होतात. पोटाचा रंग पांढरा किंवा किंचित पिवळसर असतो. खालच्या व वरच्या जबड्यांवरील पुढचे दात बरेच मोठे असतात. डोळे काळे आणि बाहुली उभी असते. या सापाची मादी फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत केव्हातरी अंडी घालते. एका खेपेला घातलेल्या अंड्यांची संख्या ४ ते ७ असते.
या सापाचे खास वैशिष्ट्ये असे आहे की, अन्य साप भिंतीवर चढू शकत नाहीत. परंतु हा साप खडबडीत भिंतीवर अगदी वेगाने चढू शकतो. हा अतिशय चपळ असून झाडांवर व इतर उंच ठिकाणी सहज चढून जातो. हा साप माणसाच्या दृष्टीस पडल्यास बहुधा निसटून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला अडथळा केला किंवा पकडण्याचा प्रयत्न केला, तर तो उग्र स्वरूप धारण करून कडकडून चावतो. पण हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याचा दंश घातक नसतो.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.