प्रजासत्ताक दिन प्रशालेत आनंदात आणि उत्साहात साजरा

पुणे, २६ जानेवारी २०२१: देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन आज प्रशालेत मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेत नव्याने तयार करण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचे तसेच ‘मएसो सुबोधवाणी’या वेब रेडिओ केंद्राचे उद्घाटन देखील करण्यात आले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे साहाय्क सचिव व शाळेचे महामात्र इंजिनिअर सुधीर गाडे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्य व शाला समितीच्या अध्यक्ष सौ. आनंदीताई पाटील, दिवंगत कमोडोर सुबोध पुरोहित यांच्या पत्नी श्रीमती नीला पुरोहित, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अभंग, पर्यवेक्षक श्री. यादव, शाळेतील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) म्हणाले की, “कोरोना महामारीमुळे राजधानी दिल्लीत होणाऱ्या देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला कोणाही प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करता आलेले नाही, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील असे चवथ्यांदा घडले आहे. कोरोना महामारीमुळे जगभर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देत भारताने आपली क्षमता जगाला दाखवून दिली आहे. देशातील नागरिकांच्या सामर्थ्यावर आपण प्रगती करत आहे हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे.

राजधानी दिल्लीत दरवर्षी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात देशाच्या विविधतेतील एकतेचे दर्शन जगाला करून दिले जाते. मी याच शाळेचा विद्यार्थी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मी शाळेत प्रथमच आलो आहे. शाळेच्या इमारतीला आता हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळाला आहे. मात्र, विविध अडचणींवर मात करून गरवारे ट्रस्टच्या सहकार्यामुळे शाळा कात टाकत आहे. संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना – MAA – च्या माध्यमातून निधी संकलन आणि अन्य शाळांमध्ये नव्या सुविधा निर्माण करण्याची व्यवस्था निर्माण केली जात आहे. दिवंगत कमोडोर सुबोध पुरोहित यांच्या कुटुंबियांच्या सहकार्याने शाळेत ‘मएसो सुबोधवाणी’ या नावाने आजपासून वेब रेडिओ केंद्र सुरू होत आहे याचा मला अभिमान आहे.”

यानंतर सर्व उपस्थितांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले.

डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन
प्रशालेतील १९७१ सालची बॅच तसेच श्री. विवेक पंडित या माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या निधीतून नव्याने तयार करण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन मा. भूषण गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी देवदत्त भिशीकर हे देखील यावेळी उपस्थित होते.

‘मएसो सुबोधवाणी’ वेब रेडिओ केंद्राचे उद्घाटन

प्रशालेतर्फे विज्ञान भारती या संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या ‘मएसो सुबोधवाणी’ या वेब रेडिओ केंद्राचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते आज करण्यात आले. मराठी माध्यमाच्या शाळेने सुरू केलेले राज्यातील हे पहिले वेब रेडिओ केंद्र ठरणार आहे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि प्रशालेचे माजी विद्यार्थी देवदत्त भिशीकर, नियामक मंडळाच्या सदस्य व शाला समितीच्या अध्यक्ष सौ. आनंदी पाटील, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, विज्ञान भारती, पुणे चे अध्यक्ष प्रा. आर. व्ही. कुलकर्णी, विज्ञान भारतीचे कार्यकर्ते व शाळेचे माजी विद्यार्थी विलास रबडे, विश्वास काळे, श्रीमती नीला पुरोहित, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अभंग, पर्यवेक्षक श्री. यादव, प्रशालेचे माजी विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि नौदलातील निवृत्त कमोडोर दिवंगत सुबोध पुरोहित यांच्या स्मरणार्थ या वेब रेडिओ केंद्राला ‘सुबोधवाणी’ हे नाव देण्यात आले आहे. पुरोहित यांचे वर्गमित्र विश्वास काळे व विलास रबडे यांनी या केंद्राच्या निर्मितीसाठी मोठे परिश्रम घेतले आहेत.

या उपक्रमाविषयी बोलताना इंजि. सुधीर गाडे म्हणाले, “कोरोना महामारीने जगाला वहिवाट सुधारून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करायला शिकवले. शिक्षण व्यवस्थेत देखील तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य ठरले आहे. त्यामुळे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने देखील तंत्रज्ञानाचा सुयोग्य अंगिकार करण्यास सुरुवात केली आहे. वेब रेडिओ केंद्राची स्थापना हा त्याचाच एक भाग आहे. विज्ञान भारतीचे यासाठी मोठे सहकार्य मिळाले आहे. तांत्रिक सहकार्याबरोबरच प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी यांना प्रशिक्षणदेखील विज्ञान भारती देत आहे. तसा एक करार देखील दोन्ही संस्थांमध्ये करण्यात आला आहे. मएसो आबासाहेब गरवारे महाविद्यालयात असलेल्या अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये या रेडिओ केंद्रासाठी आवश्यक कार्यक्रमांची निर्मिती करण्यात येत आहे. या वेब रेडिओमुळे प्रशालेच्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांच्या परंपरेला आता तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. त्यातून कल्पक, सृजनशील विद्यार्थी घडतील.”

विश्वास काळे यांनी यावेळी दिवंगत सुबोध पुरोहित यांच्या स्मृतिंना उजाळा दिला.

विज्ञान भारती, पुणे चे अध्यक्ष प्रा. आर.व्ही. कुलकर्णी म्हणाले की, वेब रेडिओचा कंटेट शाळेनेच ठरवायचा असल्यामुळे शिक्षकांना अनेक नवीन कौशल्य शिकायला मिळणार आहे. त्यातून शिक्षकांचीदेखील प्रगती होणार आहे. विश्वास काळे व विलास रबडे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच वेब रेडिओ सुरू करण्याचा प्रकल्प स्वीकारला आहे. शाळा चालवताना अनेक मर्यादा असतात तरीही प्रशालेने हा उपक्रम हाती घेतला आहे ही बाब अभिनंदनीय आहे.

विलास रबडे यावेळी बोलताना म्हणाले की, “ सध्याच्या शिक्षणातील ‘घोका आणि ओका’ ही पद्धत दूर सारून भविष्यातील सक्षम आणि आत्मनिर्भर नागरिक घडावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असे विविध कार्यक्रम ‘मएसो सुबोधवाणी’ केंद्रावर सादर करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने संस्थेच्या गरवारे महाविद्यालयाच्या अद्ययावत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पूर्णपणे आगळ्यावेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांची निर्मिती व प्रसारण करण्यात येणार आहे. सुरुवातीला आठवड्यातून तीन दिवस प्रत्येकी एक तास प्रसारण करण्यात येणार आहे. सहा महिन्यांनंतर आढावा घेऊन या केंद्राचा विस्तार करण्याची योजना आहे. इ. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उपयुक्त कार्यक्रम मएसो सुबोधवाणी केंद्रावर सादर केले जातील. सर्जनशील व कल्पक विचारांना प्रवृत्त करणारा कंटेंट हे ‘मएसो सुबोधवाणी’चे वैशिष्ट्य असेल. शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याची मांडणी केली जाईल.”

‘मएसो सुबोधवाणी’ मुळे प्रचलित शिक्षण पद्धतीला सर्जनशीलता व उपक्रमशीलतेची जोड देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे. वेब रेडिओ तंत्रज्ञानामुळे या केंद्राचे प्रसारण जगभरात होणार असून एकाच वेळी दहा हजार श्रोते त्याचे कार्यक्रम इंटरनेटद्वारे ऐकू शकतील. त्यासाठी एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. या केंद्रासाठी ऑस्ट्रेलियातील कंपनीचा सर्व्हर भाड्याने घेण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा