अंबाजोगाई, २४ फेब्रुवारी २०२४ : राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून पुन्हा राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने दिनांक २२ फेब्रुवारी पासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. निवासी डॉक्टरांच्या संपामुळे आंबेजोगाईतील स्वाराती रुग्णालयावर मोठा परिणाम दिसून आला. यापूर्वी देखील ७ फेब्रुवारीला संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांकडून घेण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवाररांसोबत झालेल्या बैठकीनंतर संप स्थगित करण्यात आला होता. मात्र आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने कालपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत.
निवासी डॉक्टरांना दिले जाणारे विद्या वेतन हे प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात होस्टेलची सोय करण्यात यावी, निवासी डॉक्टरांना विद्यावेतन हे केंद्रीय संस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्या वेतन प्रमाणे देण्यात यावे. अशा विविध मागण्यांसाठी आंबेजोगाई येथील रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास २०५ निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. अशी माहिती माआरडचे अध्यक्ष राहुल मुंडे यांनी दिली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अरुन गित्ते