कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा राजीनामा ?

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२३ :राज्याच्या राजकारणातून सध्या मोठी बातमी समोर येत असून कॉंग्रेस नेते बाळासाहेब बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.

सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आता वाढदिवसा दिनीच बाळासाहेब थोरातांनी मोठा धक्का दिला आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी पत्र दिले होते.

  • थोरातांनी पत्रात लिहले होते की,

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठे राजकारण झाले. सत्यजीत या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झाले, ते व्यथित करणारे होते. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरातांनी दिली होती. त्यानंतर आता थेट राजीनामा दिल्याने कॉंग्रेमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

  • आमच्याकडे राजीनामा आलेला नाही : नाना पटोले

याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली असून, नाना पटोले म्हणाले, आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी सदिच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो. त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो अशा मी सदिच्छा देतो. बाकी राहिला विषय बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याचा, तर, आमच्याकडे राजीनामा आलेला नाही. त्यांनी राजीनामा दिलेला नाही.

दरम्यान, या प्रकरणी आता कॉंग्रेस हायकमांड काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा