वर्क फ्रॉम होम पर्याय संपुष्टात आणल्याने, टीसीएसमधील महिला कर्मचाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू

मुंबई, १२ जून २०२३ : कोरोनाची लाट आली आणि जगाची घडी विस्कळीत झाली. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम कल्चरने आयटी आणि इतर कंपन्यांना मदत मिळाली. ऑफिसला न येता घरूनच कामे होऊ लागली. त्यामुळे कंपन्यांना चांगलाच फायदा झाला आणि कर्मचाऱ्यांचा जाण्यायेण्याचा वेळ ही वाचला. आता कोरोना स्थिती निवळली असून कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कल्चर मागे घेत कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची घडी विस्कटली आहे. तसेच जाण्यायेण्याच्या वेळेत संपूर्ण दिवस जाताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचारी काम सोडण्याच्या तयारीत आहेत. असाच काहीसा निर्णय आयटी कंपनी टीसीएसने घेतला आणि महिला कर्मचाऱ्यांचे धडाधड राजीनामे येऊ लागले. टीसीएसचे चीफ एचआर ऑफिसर मिलिंद लक्कड यांनी एका वेबसाईटला सांगितलं की, वर्क फ्रॉम होम पर्याय संपुष्टात आणल्याने महिला कर्मचारी राजीनामा देत आहेत.

टीसीएसमध्ये सहा लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात. यामध्ये ३५℅ महिलांचा समावेश आहे. टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेसमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे राजीनामा देण्याचे प्रमाण कमी आहे. पण वर्क फ्रॉम होमचा निर्णय मागे घेतल्यामुळे हे प्रमाण चांगलेच वाढले आहे. त्यामुळे कंपनीच्या कामावर परिणाम दिसून येईल, असेही काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.कोरोना संकट आणि त्यानंतर सुरू झालेलं वर्क फ्रॉम होम कल्चर यामुळे महिलांची कामे सोपी झाली होती. घरीच ऑफिसचा सेट बनवून काम केले जात होते. पण आता ऑफिसमध्ये यावे लागत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वर्क फ्रॉम होममुळे ऑफिसला जाण्यायेण्याची वेळ वाचत होती. त्याचबरोबर घरातील कामे, मुलांना सांभाळणे आणि कौटुंबिक जबाबदारीही पार पाडता येत होती. मात्र आता कंपनीने वर्क फ्रॉम होम कल्चर बंद करून ऑफिसला येण्यास सांगितल्यावर महिला कर्मचारी राजीनामा देत आहेत.टाटा कन्सलटंसीमध्ये कामात पुरुषांच्या तुलनेत महिलांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे महिलांच्या राजीनामा सत्राचे नेमके कारण वर्क फ्रॉम होम बंद होणे हेच आहे का? याची चाचपणी केली जात आहे. टीसीएसने वार्षिक अहवालात नोकरी सोडण्याच्या टक्केवारीबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. पण मागच्या आर्थिक वर्षात काम सोडण्याचे प्रमाण २०℅ हुन अधिक असल्याचे समोर आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा