वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे आज पासून पुण्यात पुन्हा निर्बंध

पुणे, २२ फेब्रुवरी २०२१: पुण्यामध्ये कोरोनाव्हायरस चे संकट पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना चा प्रभाव कमी होताना दिसला होता. मात्र, अलीकडच्या काळात पुणेकरांनी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. परिणामी, पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना चा उद्रेक होताना दिसत आहे. याची खबरदारी म्हणून प्रशासनाने पुण्यामध्ये पुन्हा एकदा प्रतिबंध लादले आहेत. पुण्याचे आयुक्त विक्रमकुमार यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत.

कोणते आहेत प्रतिबंध

१. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये यांचे नियमित वर्ग तसेच सर्व खाजगी शिकवणी वर्ग (Coaching Classes) दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ ते दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्णत: बंद राहतील.
तथापि, ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.

२. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अभ्यासिका ५०% क्षमतेने सामाजिक अंतर (Social Distancing ) व सॅनिटेशनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरु राहतील.

३. लग्न समारंभ हे मंगल कार्यालय (खुले अथवा बंदिस्त) येथील आसन क्षमतेच्या ५०% क्षमता किंवा २०० व्यक्ती यापैकी जे कमी असेल तेवढ्या व्यक्तींच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. तसेच ज्यांचेकडील लग्न समारंभ आहे त्यांनी याकरिता पोलिसांचे ना-हरकत प्रमाणपत्र
घेणे बंधनकारक राहील.

४. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट, इ.आस्थापना रात्री ११:०० वाजेपर्यंतच सुरु राहतील.

५. पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण/ सेवा वगळता दिनांक
२२ फेब्रुवारी २०२१ पासून रात्री ११:०० ते सकाळी ०६:०० यावेळेत संचार करणेस प्रतिबंध असेल. मात्र, यामधून जीवनावश्यक वस्तूंचा (दुध,भाजीपाला, फळे इ.) पुरवठा करणारे, वृत्त पत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना / व्यक्तींना व त्यांच्या
वाहनांना वगळण्यात येत आहे. तसेच ज्या उद्योगांचे शिफ्टमध्ये कामकाज चालते अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचाऱ्याना व त्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना सदर आदेशामधून वगळण्यात येत आहे.

६. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, सांस्कृतिक सभागृह, नाट्यगृह, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे, उद्याने व तत्सम मोठ्या संख्येने लोक
एकत्र येवू शकतील अशा प्रकारचे कार्यक्रमाचे ठिकाणी सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. त्याच प्रमाणे यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या
आदेशानुसार उपरोक्त नमूद सर्व ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता संयोजकांनी घ्यावी. तसेच सामाजिक अंतर (Social Distancing ) व सॅनिटेशनच्या
नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा