नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२२: सर्वसामान्यांसोबतच मोदी सरकारसाठीही आनंदाची बातमी आलीय. देशातील किरकोळ चलनवाढीचा दर बराच काळ आरबीआयनं ठरवून दिलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त होता. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेनं पॉलिसी रेट किंवा रेपो रेटमध्ये सलग पाच वेळा वाढ केली. या पावलांचा परिणामही दिसून आला आणि जिथे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई ६.७७% वर आली होती, ती आता ५.८८% वर आलीय. सरकारच्या म्हणण्यानुसार किरकोळ महागाईचा दर ११ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचलाय. त्याची आकडेवारी सोमवारी सरकारने जाहीर केली.
सरकारने जाहीर केलेली मदतीची आकडेवारी
ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर महिनाही महागाईच्या आघाडीवर मोदी सरकारसाठी दिलासा देणारा ठरला. प्रत्यक्षात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सरकारसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आली. बर्याच कालावधीनंतर देशातील किरकोळ महागाईचा दर अखेर रिझर्व्ह बँकेनं (RBI) निर्धारित केलेल्या लक्ष्याच्या आत आलाय. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.८८ टक्क्यांवर आलाय.
ऑक्टोबरमध्ये महागाई ७ टक्क्यांच्या खाली
यापूर्वी, ऑक्टोबर २०२२ मध्ये किरकोळ महागाई दर ६.७७ टक्क्यांवर आला होता. नोव्हेंबर महिन्यातील किरकोळ महागाईच्या मोठ्या घसरणीमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्याचा मोठा हात आहे. अन्नधान्य महागाई दर ४.६७ टक्क्यांवर आलाय, तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा ७.०१ टक्के होता. त्याचवेळी, नोव्हेंबर महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात अन्नधान्य महागाईत घट झालीय.
सीपीआय ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
चालू कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीपासून पहिल्यांदाच किरकोळ महागाईचा दर ६ टक्क्यांच्या खाली आलाय. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई ७.४१ टक्के होती. देशातील किरकोळ महागाईचा हा ११ महिन्यांचा नीचांक आहे. रिझर्व्ह बँकेनं देशात महागाई दर २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचं लक्ष्य ठेवलंय. अशा परिस्थितीत आरबीआयनं उचललेल्या कठोर पावलांनंतर नोव्हेंबरचे आकडे दिलासा देणारे आहेत.
आरबीआयचे प्रयत्न फळाला
विशेष म्हणजे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी RBI ने मे २०२२ पासून रेपो दरात पाच वेळा वाढ केलीय. मात्र, ऑक्टोबरमध्ये किरकोळ चलनवाढ ७ टक्क्यांवर आल्यानंतरही रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ३५ बेसिस पॉईंटची वाढ केली. यानंतर रेपो दर ६.२५ टक्के झालाय. या वाढीबाबत आरबीआय गव्हर्नर म्हणाले होते की, महागाईविरुद्ध युद्ध अजूनही सुरू आहे, ती ६ टक्क्यांच्या खाली आणली जाईल. अखेर, आरबीआयने उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम किरकोळ महागाई दरावर दिसू लागलाय.
तज्ञांच्या अपेक्षेपेक्षा चांगले आकडे
ऑक्टोबर २०२२ मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर कमी झाल्यानंतर, तज्ञांना देखील अपेक्षा होती की किरकोळ चलनवाढ नोव्हेंबरमध्ये ६.७७ टक्क्यांवरून ६.३० टक्क्यांपर्यंत खाली येईल. मात्र सरकारने जाहीर केलेली आकडेवारी या अपेक्षेपेक्षाही मोठी घसरण आहे. दरम्यान, देशातील उत्पादन क्षेत्रातील उत्पादनात घट आणि खाण-ऊर्जा उत्पादनातील कमकुवत वाढ यामुळं ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन (IIP) ४ टक्क्यांनी घसरलं. एका वर्षापूर्वी याच कालावधीत म्हणजेच ऑक्टोबर २०२१ मध्ये आयआयपी ४.२ टक्क्यांनी वाढला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे