ऑनलाईन फसवणुकीतुन निवृत्त कर्नलची आयुष्यभराची कमाई लंपास

पुणे, ८ जून २०२३ : देशभरात ऑनलाइन फसवणूक करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. ऑनलाईन चोरी करणारे सायबर चोरटे नवनवीन शक्कल लढवून फसवणूक करत आहेत. मोहापायी अनेक जण त्यांच्या सापळ्यात अडकताच त्यांची आयुष्यभराची कमाई लंपास होत आहे. आता पुणे शहरात एका निवृत्त कर्नलची आयुष्यभराची कमाई गेली आहे. आजपर्यंत शहरात झालेल्या ऑनलाईन फसवणुकी पेक्षा मोठा गुन्हा घडला आहे. परंतु सायबर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण नगण्य आहे.

या घटनेबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल पाटील यांनी सांगितले की, पुण्यातील बंडगार्डनमध्ये एक ७२ वर्षीय निवृत्त कर्नल राहतात. त्यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये व्हिडिओ लाईक करणे आणि रिव्ह्यू लिहिण्याच्या कामाची ऑफर दिली. सुरुवातीला या कर्नलला पैसैही मिळाले. त्यानंतर या कर्नलला स्वतः गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले.

त्याचबरोबर त्यांना सायबर भामट्यांनी विविध बँकांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितले. त्यांनी भामट्यांनी दिलेल्या ४८ विविध बँक खात्यांवर पैसे पाठवले. त्यांच्यांकडे असणारी सर्व बचत आणि सेवा निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम यामध्ये गुंतवली. यासंदर्भात त्यांनी कुटुंबाशीही चर्चा केली नाही. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये. आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये. सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नुकतेच पुण्याचे जिल्हाधिकारी सायबर चोरट्यांच्या रडारवर आले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्याचे सत्र सुरूच आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे फोटो वापरत मागील महिन्यात “माही वर्मा” या नावाने फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते. यावेळी पुन्हा एकदा देशमुख यांचे नाव आणि फोटो वापरून बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा