मुंबई, १५ जुलै २०२१: आज पार पडलेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार प्रामुख्याने आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षांपर्यंत वाढवण्याला मान्यता देण्यात आली आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा , गट- अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मान्यता देण्यात आली.
सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची नितांत आवश्यकता आहे. त्यांचा अनुभव साथरोग नियंत्रणात महत्वाचा ठरु शकतो. याचा विचार करुन शासनाकडून वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वरिष्ठ अधिकारी (वेतनस्तर एस-२३ : ६७७००-२०८७०० व त्यावरील) तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ (वेतनस्तर एस-२० : ५६१००-१७७५००) यांचे निवृत्तीचे वय ३१ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी ६२ वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयास कार्योत्तर मंजुरी देण्याचा तसेच त्याअनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील नियम १० मध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे