‘रिब्यूट इंडस्ट्रियल सेक्टर-पोस्ट कोविड’ संदर्भात सुभाष देसाई यांनी साधला ऑनलाइन संवाद

मुंबई, दि. १२ जून २०२०: ‘रिब्यूट इंडस्ट्रियल सेक्टर-पोस्ट कोविड’ या विषयावरील चर्चासत्रात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ऑनलाइन संवाद साधला. लघु , सूक्ष्म व मध्यम उद्योग संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके, उज्ज्वल कोठारी, सागर भोसले आदी या चर्चेमध्ये सहभागी झाले होते.

विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात उद्योग विभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे. पुढील दोन-तीन दिवसांत विविध देशांतील १० गुंतवणूकदारांसोबत करार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय अमेरिका, युरोप, जपान, कोरिया, तैवान आदी देशांमधील गुंतवणूकदारांसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांना महाराष्ट्राकडे खेचण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांकडून पुढाकार घेण्यात आला आहे. चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी ‘महाराष्ट्र एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनाझेशन’ची (मेट्रो) स्थापना करणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

राज्यात आतापर्यंत ६० हजार उद्योग सुरू झाले आहेत, त्यात १५ लाख कामगार देखील रुजू झाले आहेत. काही उद्योगांना अद्याप भेडसावणारा मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी औद्योगिक कामगार ब्युरोची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी वेबपोर्टल देखील तयार करण्यात आले आहे. या वेब पोर्टल द्वारे कुशल-अकुशल कामागारांची माहिती मिळणार आहे. जून अखेर कामगार ब्युरो सुरू होईल असे या संवादाच्या वेळेस सुभाष देसाई यांनी सांगितले.

स्थलांतरित मजूर नसल्यामुळे काही उद्योगधंदे सुरू होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे स्थलांतरित मजुरांनी पुन्हा यावे असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांना सर्व सहकार्य केले जाईल तसेच या सर्व मजुरांची नोंदणी सुद्धा केली जाईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. कोविड -१९ च्या संकटामुळे कुठल्या राज्यातून किती लोक आले याची नोंद ठेवली जाईल. नोंदणी हे क्रांतिकारक पाऊल ठरेल असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा