गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा रिक्षा मालक-चालकांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे ! काँग्रेस आमदार यांची मागणी

रिक्षा मालक-चालकांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे ! काँग्रेस आमदार यांची मागणी

पुणे,दि.२८ एप्रिल २०२० : लॉकडाऊनच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने रिक्षा वाहतुकीला बंदी केली आहे, परंतू या महिनाभराच्या काळात रिक्षा मालक-चालकांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यांना आर्थिक समस्या जाणवू लागली आहे, तरी त्यातून दिलासा मिळण्यासाठी प्रत्येक रिक्षा मालक-चालकांना सरकारने पाच हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे अशी मागणी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी, आणि महाराष्ट्र रिक्षा मालक-चालक महासंघाचे सरचिटणीस नितीन पवार, यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रात दहा लाख आणि पुण्यात सुमारे एक लाख रिक्षा मालक चालक आहेत. त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रिक्षा व्यवसायाच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. लॉकडाऊनचा एक महिन्याचा काळ होऊन गेला आहे . या काळात व्यवसाय बंद असल्याने त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. रिक्षा व्यवसाय आणखी अनिश्चित काळपर्यंत बंद ठेवावा लागणार असल्याने त्यांची हलाखीची स्थिती होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे त्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरुन निघण्यासाठी राज्य सरकारने त्यांना पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे असे मोहन जोशी, आणि नितीन पवार, यांनी निवेदनात म्हटले आहे.राज्य सरकारने बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य दिले. त्याचप्रमाणे रिक्षा मालक-चालकांच्या मागणीचाही सहानुभूतीने विचार करावा असे जोशी यांनी न्यूज अनकट शी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट – प्रतिनिधी -ज्ञानेश्वर शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version