नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२३ :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरुन जेएनयूमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. जेएनयूमध्ये दोन गट या मुद्द्यावरुन भिडले असून दगडफेक झाल्याचाही दावा केला जात आहे. अभाविप आणि डाव्या विद्यार्थ्यांमध्ये ही दगडफेक झाली आहे. यासोबतच जेएनयूतील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
भारतात २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगली संदर्भात बीबीसीच्या एका डॉक्युमेंट्रीवर भारत सरकारने जोरदार आक्षेप घेतला आहे. बीबीसीच्या या डॉक्युमेंट्रीला भारतात बॅन करण्यात आले आहे. या डॉक्युमेंट्रीचे जेएनयूमध्ये स्क्रीनिंग सुरु असताना अचानक वीज गेली. विद्यार्थ्याचा असा आरोप आहे की, ही वीज विद्यापीठाने कट केली आहे. तर विद्यापीठाच्या विद्युत विभागातील काही लोकांचे म्हणणे आहे की, वीजेच्या तारेत मोठा बिघाड झाल्याने वीज गेली.
वीज गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी ही डॉक्यूमेंट्री मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहिली. दरम्यान, जेएनयूच्या छात्रसंघाची अध्यक्षा आइषी घोष यांनी हे स्क्रीनिंग सुरू असताना अभाविपने दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये काही लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आइशी घोष यांनी २५ जणांविरोधात पोलिसात तक्रार केली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी अद्याप एफआयआर नोंदविण्यात आला नाही आहे. आम्हाला जेएनयूकडून काही तक्रार आल्यास आवश्यक ती कारवाई केली जाईल.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.