कुराण जाळल्यामुळं स्वीडनमध्ये उसळली दंगल, सौदी अरेबियाने दिली तीव्र प्रतिक्रिया

स्वीडन, 19 एप्रिल 2022: स्वीडनमध्ये रमजान महिन्यात मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण जाळल्याप्रकरणी दंगल उसळली असून त्यात अनेक पोलीस जखमी झाले असून तीन जणांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. स्वीडनमधील अतिउजव्या गटांनी मुद्दाम कुराण जाळल्याच्या प्रकरणी सौदी अरेबिया या मुस्लिम देशामध्ये खळबळ उडाली आहे. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने कुराण जाळल्याचा तीव्र निषेध केला असून, हे जाणूनबुजून प्रक्षोभक कृत्य असल्याचं म्हटलंय.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, सौदी अरेबिया जाणूनबुजून पवित्र कुराण आणि मुस्लिमांचा अपमान आणि चिथावणी देण्याच्या घटनेचा निषेध करतो. निवेदनात सौदी परराष्ट्र मंत्रालयाने संवाद, सहिष्णुता आणि सहअस्तित्वाची मूल्ये वाढवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांच्या महत्त्वावर भर दिला. द्वेष, अतिरेकी आणि सर्व धर्मांच्या पवित्र स्थळांवर होणारे हल्ले रोखण्यावरही भर देण्यात आला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्वीडनमधील अतिउजव्या गटांनी कुराण पेटवलं, त्यानंतर दंगल उसळली. डेन्मार्कच्या अत्यंत उजव्या राजकीय पक्ष हार्ड लाइनचा अतिरेकी नेता रासमुस पालुदान याने गुरुवारी अनेक स्वीडिश शहरांमध्ये कुराण जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले.

कार्यक्रमात कुराणाच्या प्रती जाळण्यात आल्या. आपण कुराण जाळले असून हे काम आपण यापुढेही सुरू ठेवणार असल्याचे पालुदान यांनी सांगितलं.

कुराण दहनाच्या घटनेनंतर गुरुवार ते रविवारपर्यंत हिंसाचार झाला, ज्यात सुमारे 16 पोलीस जखमी झाले. अनेक वाहनं जाळण्यात आली. नॉरशॉपिंग शहरात रविवारी हिंसाचार झाला, ज्यामध्ये तीन जणांना पोलिसांच्या गोळ्या लागल्या.

पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन यांनी हिंसाचाराचा निषेध केलाय. पोलिसांनी एका ऑनलाइन निवेदनात म्हटलंय की, ‘तीन जणांना गोळ्या लागल्याचे दिसत आहे आणि आता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीनही जखमींना गुन्ह्याच्या संशयावरून अटक करण्यात आलीय. पोलिसांनी सांगितलं की, रविवारी संध्याकाळी नॉर्शॉपिंगमधील परिस्थिती शांत होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा