राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर रिपाइ आठवले गटाचा हल्लाबोल!

20

पुणे १३ फेब्रुवारी २०२५ : सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आक्रमक झाली आहे. आज रिपाइ कार्यकर्त्यांनी सोलापूरकर यांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. आंदोलकांनी सोलापूरकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

“राहुल सोलापूरकर हे जाणीवपूर्वक महापुरुषांवर आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. ज्या व्यक्तीने राजर्षी शाहू महाराजांची भूमिका साकारली, त्याला बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व ठाऊक नसावे, हे धक्कादायक आहे,” असे परशुराम वाडेकर म्हणाले. त्यांनी सोलापूरकर यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी सरकारवर टीका करत सोलापूरकर यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

या आंदोलनात मोठ्या संख्येने रिपाइ कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी सोलापूरकर यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.रिपाइ आठवले गटाने सरकारला इशारा दिला आहे की, जर तातडीने कारवाई केली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल. या आंदोलनामुळे राहुल सोलापूरकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा