ऋषभ पंतच्या वैद्यकीय टीमने साधला माध्यमांशी संवाद; ऋषभला पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे

देहरादून, २ जानेवारी २०२३ : भारताचा यशस्वी खेळाडू ऋषभ पंत डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. ऋषभ पंतच्या अपघातामुळे क्रीडाविश्वाप्रमाणेच मंत्री आणि अभिनय क्षेत्रातील कलाकारांना धक्का बसला. अनेक कलाकारांनी आणि मंत्र्यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन त्याची विचारपूस केली, तर समाजमाध्यमांद्वारे अनेकांनी त्याच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली.

या अपघातामुळे ऋषभच्या खेळावर आणि शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम झाला आहे. याच विषयी पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी संवाद साधताना काही गोष्टी स्पष्ट केल्या. वैद्यकीय टीमच्या सदस्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषभ पंतला शारीरिकच नव्हे, तर मानसिक दृष्टिकोनातूनही पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे असून, सातत्याने येणाऱ्या लोकांशी बोलल्याने त्याची शक्ती वाया जात आहे. म्हणूनच भेटायला येणाऱ्या लोकांनी भेटण्यासाठी येणे टाळावे आणि त्याला विश्रांती घेऊ द्यावी, असे मत एका सदस्याने व्यक्त केले.

ऋषभच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली आहे. रविवारी रात्रीच त्याला अतिदक्षता विभागातून खासगी रूममध्ये शिफ्ट केल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळत आहे. अशावेळी त्याला योग्य विश्रांती मिळाल्यास तो लवकर बरा होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर आतापर्यंत ऋषभ पंतला भेटण्यासाठी क्रिकेटपटू नितीश राणा, आमदार उमेश कुमार, दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे संघ संचालक शाम शर्मा त्याचप्रमाणे अभिनेता अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी रुग्णालयात हजेरी लावली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा