मुंबई, २ जानेवारी २०२३: मराठी बरोबरच हिंदी सिनेमा सृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करणारा उत्कृष्ट अभिनेता रितेश देशमुख याने एक दिग्दर्शक म्हणून प्रवास सुरू केला. त्याची पत्नी जिनिलियाने देखील त्याला साथ दिली आणि चित्रपटाची निर्मिती केली. या जोडीने मराठी चित्रपटसृष्टीत एक भन्नाट चित्रपट बनवला. दोघांचा प्रयत्नातून निर्माण झालेल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘वेड’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
- ‘वेड’ मुळे मराठी चित्रपट सृष्टीत नवचैतन्य निर्माण
३० डिसेंबर २०२२ ला वेड हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवशी या सिनेमाने या चित्रपटाने २.२५ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ३.२५ कोटींचा पल्ला गाठला. रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी ४.५० कोटींपर्यंत कमाई केली. तीन दिवसातच या सिनेमाने १० कोटी कमाई केल्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीत नवा आशेचा किरण दिसला आहे. मराठी चित्रपटांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाले असतानाच ‘वेड’ या मराठी चित्रपटाने मिळवलेल्या या यशामुळे मराठी चित्रपट सृष्टीत नवचैतन्य निर्माण झाले आहे.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्याप्रमाणे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. त्याचप्रमाणेच जिनिलिया देखील पहिल्यांदाच मराठी चित्रपटात नायिकेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाची कथा उलगडली आहे. क्रिकेट खेळण्यात पटाईत असणारा सत्या आणि रेल्वेत काम करणारी श्रावणी या दोघांचे आयुष्य मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला गेला आहे. दोघांच्या प्रेमामधील दुरावा, श्रावणीचे सत्या वरील प्रेम, शेखरअण्णा नावाच्या गुंडाबरोबर सत्याचे वैर या सर्व घटनांची सुंदर मांडणी प्रेक्षकांना चित्रपट पाहायला प्रोत्साहित करते. तर चित्रपटातील गाण्यांना समाज माध्यमांद्वारे अतिशय प्रसिद्धी मिळाली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे