मुंबई, १२ ऑक्टोंबर २०२२ : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शिवसेना या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.
अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की,
रमेश लट्के हे कट्टर शिवसैनिक होते. त्यांनी अनेक शाखांमध्ये काम केलं. शिवसेनेला मोठं योगदान दिलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात तिकीट देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एक महिन्यानंतर त्यांना त्यांचा राजीनामा चुकीच्या पद्धतीने दिल्याचं सांगितल्याचं सांगून त्यांचा राजीनामा नाकारला गेला.
त्यामुळे त्यांनी नव्याने राजीनामा दिला. लटके यांना शिंदे गटाकडून मंत्रीपदाची ऑफर देण्यात येत असून त्यांना आपल्याकडे ओढण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा यावेळी अनिल परब यांनी केला आहे. या प्रकरणी आम्ही कोर्टात गेल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
महापालिका आयुक्तांवर दबाब ?
शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये यासाठी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांवर दबाव असल्याचा आरोप परब यांनी केला. आपण स्वत: महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र, त्यावेळेस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ऋतुजा लटके या तृतीय श्रेणीतील पालिका कर्मचारी आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार सहाय्यक आयुक्तांना आहे. तरीदेखील हे प्रकरण आयुक्तांकडे कसे गेले, असा सवालही परब यांनी उपस्थित केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे.