मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ : अप्पर वर्धा कृती समितीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र शासनाने नोकरी आणि मोबदल्याचं आश्वासन दिलं होतं, जे गेल्या ४५ वर्षांमध्ये कोणत्याही सरकारने पूर्ण केलं नाही असा आरोप करत धरणग्रस्तांनी आज थेट मंत्रालयात आंदोलन केल मंत्रालयात आत्महत्या होऊ नये यासाठी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर बसवण्यात आलेल्या सुरक्षा जाळीवर उड्या मारत धरणग्रस्तांनी आंदोलन केल दरम्यान, या आंदोलनावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार यांच्या गटातील आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, या आंदोलनाची कुठे ना कुठेतरी, कोणी ना कोणीतरी दखल घेतली पाहिजे. मुद्दाम कोणीही असं करत नाही, मुद्दाम कोणी अशा उड्या मारत नाही. कोणीही अशा उड्या मारू नये. कोणीही अशा पद्धतीने आंदोलन केलं नाही पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन कोणी करू नये, परंतु, त्यांचा (धरणग्रस्तांचा) आवाज कोणीच ऐकत नसेल तर अशा पद्धतीने काही गोष्टी कराव्या लागतात. या सरकारने आजच त्यांना वेळ देऊन त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. परंतु, हा विषय सोडला तर आज महाराष्ट्रात काय चाललंय? राज्यातल्या शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, युवकांचे प्रश्न आहेत, हे सरकार राज्यातल्या प्रश्नांसदर्भात गंभीर नाही. असे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
मंत्रालयामध्ये सकाळपासूनच एक मेडिकल कॅम्प सुरू होता. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. पण अचानक काही शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या जाळीवर धाव घेतली. त्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ माजली. त्यानंतर या आंदोलकांनी त्यांची सर्व परिपत्रकं खाली फेकण्यास सुरुवात केली दरम्यान आमच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नसल्यामुळे आम्ही हा आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यावेळी मंत्रालयात उपस्थित असल्याची माहिती देखील समोर येत आहे. मागील १०३ दिवसांपासून हे शेतकरी मागण्यात करत असल्याचं म्हटलं जात आहे. अप्पर वर्धा प्रकल्पासाठी अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी या सरकारला दिल्या आहेत. पण त्याबदल्यात शासनाकडून मिळणारी हक्काच्या मोबादल्याची रक्कम अजूनही मिळाली नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं असून त्यासाठी ही आक्रमक भूमिका घेतली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे