जामखेड, २८ सप्टेंबर २०२०: राष्ट्रवादीचे जामखेडाचे आमदार रोहित पवार यांचा २९ सप्टेंबरला वाढदिवस आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे वाढदिवस साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय पवार यांनी घेतला आहे. यासोबतच त्यांनी आपले कार्यकर्ते आणि समर्थकांना कोरोनाच्या कठीण काळात गरजूंना मदत करण्याचे भावनिक आवाहन केलं आहे.
रोहित पवार यांनी आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझे मित्र, भाऊ-भगिनी व कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करायला सुरुवात केली. आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल’ असं रोहित पवार म्हणाले.
तसंच, ‘वाढदिवसानिमित्त मला आपल्या सर्वांकडून एक गिफ्ट हवंय. मी ते तुम्हाला हक्काने मागतोय आणि आपण ते मला नक्की द्याल असा मला विश्वास आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अनेक जणांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांना, महिलांना, तरुणांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसाला बॅनर, होर्डिंग, जाहिराती यावर खर्च करण्यापेक्षा गरजूंना मदत करावी असे आवाहन पवार यांनी केले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव