मुंबई, २४ जुलै २०२३ : राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार हे आज भरपावसात विधानभवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलनला बसले आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत बोलताना म्हणाले की, पावसाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड एमआयडीसी संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. अधिवेशन अजून संपलेलं नाही, फक्त एक आठवडा झाला आहे.
लोकप्रतिनिधींनी निवेदन दिल्यावर, त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि मंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. त्यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने आंदोलनाला बसणे योग्य नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. सरकारने कर्जत-जामखेड येथील एमआयडीसीला मंजुरी रोखल्याच्या निषेधार्थ रोहीत पवार हे आंदोलन करत आहेत.
दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार, असा फलक हातात घेऊन त्यांनी सरकारचा निषेध केला. माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. सरकार दबावाच्या राजकारणाला बळी पडत आहे, असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे. एमआयडीसीला मंजुरी मिळाली पाहिजे, कर्जत जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर