Ind Vs Wi 1st T20, ३० जुलै २०२२: टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेपासून जी मालिका सुरू केली, ती वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतही सुरू आहे. शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ६८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात संघाच्या विजयाचा हिरो ठरला रोहित शर्मा, ज्याने ६४ धावांची जबरदस्त इनिंग खेळली.
टीम इंडियाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १९० धावा केल्या, प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला २० षटके खेळून केवळ १२२ धावा करता आल्या. वेस्ट इंडिजने त्यांच्या 8 विकेट गमावल्या, पण अखेरीस टीम इंडियाने हा सामना ६८ धावांनी जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
स्कोअरबोर्ड: भारत – १९०/६, वेस्ट इंडिज – १२२/८
फिरकीपटूंच्या जोडीने विंडीजचे कंबरडे मोडले
१९१ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने सुरुवातीपासूनच विकेट गमावण्यास सुरुवात केली. अर्शदीप सिंगने प्रथम काईल मायर्सला बाद केले, त्याच्यानंतर जेसन होल्डरही खाते न उघडताच बाद झाला. पण वेस्ट इंडिजसाठी रविचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई यांची जोडी दुःस्वप्न ठरली.
दोन्ही फिरकीपटूंनी एकूण चार बळी घेतले, अश्विनने ४ षटकात फक्त २२ धावा दिल्या आणि २ बळी घेतले. तर रवी बिश्नोईने 4 षटकात २६ धावा देत फक्त २ विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजकडून एस. ब्रुक्सने २०, कर्णधार निकोलस पूरनने १८ धावा केल्या.
कर्णधार रोहितच्या पुनरागमनामुळे भारत मजबूत
एकदिवसीय मालिकेतून ब्रेक घेतलेल्या रोहित शर्माने टी-२० मालिकेत पुनरागमन केले. T20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया तयारीमध्ये व्यस्त आहे, येथे रोहित शर्माने विरोधी संघावर फटकेबाजी केली. रोहितने ६४ धावांच्या खेळीत ७ चौकार, २ षटकार मारले.
रोहित शर्माशिवाय फिनिशर दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा अप्रतिम खेळ दाखवला. मध्यंतरी जेव्हा टीम इंडियाचा डाव फसला तेव्हा अखेर दिनेश कार्तिकने १९ चेंडूत ४१ धावांची खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.
दिनेश कार्तिकने आपल्या खेळीत ४ चौकार, २ षटकार मारले. त्याच्यासोबत रविचंद्रन अश्विननेही १० चेंडूत १३ धावा केल्या आणि अखेर टीम इंडियाची धावसंख्या १९० धावांपर्यंत पोहोचली. याशिवाय सूर्यकुमार यादवने २४, ऋषभ पंतने १४, रवींद्र जडेजाने १६ धावा केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे