पल्लेकेले,श्रीलंका ५ सप्टेंबर २०२३ : कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या स्फोटक अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने सोमवारी येथे पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीने नेपाळचा १० गडी राखून पराभव केला. अ गटातून, भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी तीन गुणांसह सुपर फोरमध्ये प्रवेश केला तर नेपाळ दोन्ही सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यातही पावसामुळे जवळपास तीन तासांचा खेळ होऊ शकला नाही. नेपाळला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्याने ४८.२ षटकात २३० धावा केल्या. भारताने २.१ षटकात बाद न होता १७ धावा केल्या असताना पावसामुळे खेळ जवळपास दोन तास थांबला. यानंतर डकवर्थ लुईस पद्धतीने भारताला २३ षटकांत १४५ धावांचे लक्ष्य मिळाले.
भारताने २०.१ षटकात बिनबाद १४७ धावा करत विजय मिळवला. रोहितने ५९ चेंडूंत सहा चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद ७४ धावा केल्या, तर गिलने ६२ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ६७ धावा केल्या. या आधी आसिफ शेख (९७ चेंडूत ५८ ) आणि कुशल भुरटेल (२५ चेंडूत ३८) यांनी नेपाळला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या. खालच्या फळीत सोमपालने ५६ चेंडूत ४८ धावांची उपयुक्त खेळी केली.
नेपाळच्या अननुभवी फलंदाजांविरुद्ध प्रभाव पाडण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. भारताकडून रवींद्र जडेजाने ४० धावांत तीन विकेट्स घेतले, मात्र दुसरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला (१० षटकांत ३४ धावा) यश मिळाले नाही. वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराजने ६१ धावांत तीन विकेट्स घेतले तर मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड