23 जानेवारी 2025 मुंबई : भारतीय संघाचा अनुभवी आणि स्टार फलंदाज कर्णधार रोहित शर्मा अलीकडे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीटमध्ये फॉर्म साठी सातत्याने झगडताना दिसला. या परिस्थितून बाहेर निघण्यासाठी आणि आपला पहिला फॉर्म परत आणण्यासाठी त्याने 10 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळण्याचा विचार केला. मात्र, काल झालेल्या जम्मू काश्मीर विरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना रोहितला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याने केवळ ३ धावा करून पॅव्हेलियनचा रस्ता धरला असून त्याने पुन्हा एकदा चाहत्यांना नाराज केलं आहे.
जम्मू काश्मीर विरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यात रोहितने १९ चेंडूचा सामना करत केवळ ३ धावा केल्या. रोहितला उमर नाझीरने बाद केले. ॲडलेर कसोटीत ज्याप्रमाणे रोहित शर्मा बाद झाला, त्याच प्रमाणे कालच्या सामन्यात सुद्धा तो बाद झाला. त्यासोबत सलामीवीर असलेल्या यशस्वी जयस्वालला सुद्धा विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही, त्याने पहिल्या डावात 8 चेंडूत केवळ 4 धावा केल्या. दोघे सलामीवीर बाद झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी स्टेडियममधून बाहेर पडण्यास सुरुवात केली. यावरून असे वाटते की ते फक्त रोहित आणि जयस्वालची कामगिरी पाहण्यासाठीच आले होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी चिंता
पुढच्या महिन्याच्या 19 फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे.यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्मा सुद्धा या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच त्याचा असा राहिलेला फॉर्म टीम इंडियसाठी चिंतेचा विषय असू शकतो. भारतीय संघाचा 20 फेब्रुवारी रोजी बांग्लादेशसोबत पहिला सामना खेळणार आहे. या आधी रोहित शर्मा इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत सर्वांचे लक्ष त्याच्या कामगिरीकडे असणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर