छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० पदाधिकाऱ्यांची सामुदायिक राजीनाम्याची भूमिका

छत्रपती संभाजीनगर, ८ मार्च २०२३ : औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आल्यानंतर ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून कलेक्टर ऑफिससमोर मागील पाच दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहे. त्यातच महाराष्ट्र मुस्लिम आवामी कमिटीकडून १० मार्चला शहर बंदची हाक देण्यात आली असताना, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५० पदाधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामांतर केल्याने सामुदायिक राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नामांतरावरून दोन गट निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराच्या ठरावास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी सहमती दिली आणि त्यानंतर शहराचे नामांतर करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले असा आमचा विश्वास आहे. आजपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे,क्षअशी आमची भावना होती. त्यामुळे आजपर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत होतो; परंतु नामांतरास समर्थन दिल्यामुळे आमची ही भावना संपली आहे व आमच्यासोबत पक्ष न्याय करू शकत नाही, असा आमचा विश्वास झाला असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १० आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील ४० पदाधिकाऱ्यांनी सामुदायिक राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. आता या निर्णयाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कोणती भूमिका घेण्यात येते, याकडे लक्ष राहणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा