माढा (सोलापूर), ११ डिसेंबर २०२०: उजनी धरणात सध्या ११० टक्के पाणीसाठा असून त्यात ५८.९४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पावसाळा संपून जवळपास दोन महिन्याचा कालावधी झाला असून रब्बी पिकांसाठी आता पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली होती, त्यामुळे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुढील पाणी सोडण्याचे नियोजन मात्र, कालवा सल्लागार समितीत त्यावर अंतिम निर्णय होणार असून यावर्षाअखेर समितीची बैठक होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात रब्बी पिकांखाली तीन लाख ५१ हजार ८२० हेक्टर एवढे क्षेत्र आहे. तर ३८ हजार ८०० हेक्टर एवढे गहू या पिकाखालील क्षेत्र आहे. मकेचे क्षेत्र ३५ हजार २५० हेक्टर असून तृणधान्याचे जिल्ह्यात चार लाख २५ हजार ४२५ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ४८ हजार हेक्टरवर तृणधान्यांची लावगड झाली आहे.
हरभरा पिकाचे एकूण क्षेत्र ५५ हजार ८० हेक्टरवर झाली आहे. जिल्ह्यात दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. पावसाळा संपून आता दोन महिन्यांचा कालावधी होत असून रब्बी पिकांना येणाऱ्या काळात पाण्याची गरज भासणार आहे. कोरोनामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप होऊ शकलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील