‘आरपीआय’ला महाराष्ट्राबाहेर यश; नागालँडमध्ये २ जागा जिंकल्या

पुणे, २ मार्च २०२३ : देशातील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज गुरुवारी (ता. २ मार्च) हाती येत आहेत. आतापर्यंत बहुतांश जागांवरची स्थिती स्पष्ट झाली आहे. मोजक्याच जागांवर मतमोजणी सुरू झाली आहे. नागालँड विधानसभेच्या दोन जागांवर रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन आमदार निवडून आले आहेत. महाराष्ट्राबाहेर प्रथमच रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाला यश मिळाले आहे. ईशान्येतील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यांमध्ये आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरवात झाली.

तिन्ही राज्यांमध्ये ६०-६० जागा आहेत. या विधानसभा निवडणुकांमध्ये त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला, नागालँड आणि मेघालयमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान झाले. नागालँडमध्ये दोन जागांवर ‘आरपीआय’च्या दोन उमेदवारांनी विजय मिळविला.

आठवले यांचा पक्ष ‘आरपीआय’च्या लिमा ओनेन चँग यांनी नागालँडमधील नोक्सेन जागेवर विजय मिळविला आहे. इम्तिचोबा यांनी तुएनसांग सदर-२ ची जागा जिंकली आहे. अशाप्रकारे आठवले यांच्या पक्षाने महाराष्ट्राबाहेर यशाचा झेंडा फडकावीत पक्षाला प्रसिद्धीच्या झोतात आणले आहे.

नागालँडमधील गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०१८ मध्ये NPF ने २६ जागा जिंकल्या होत्या. नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीला (एनडीपीपी) १७ जागांवर यश मिळाले. भाजपने १२ जागा जिंकल्या होत्या. उर्वरित ठिकाणी इतर उमेदवारांना यश मिळाले. काँग्रेसचे खातेही उघडता आले नाही. त्रिपुराबाबत बोलायचे झाले तर २०१८ मध्ये भाजपने येथे पहिल्यांदाच विजय मिळविला होता. भाजपने एकूण ३५ जागा जिंकल्या होत्या. सीपीएमला १६ जागा मिळाल्या, तर आयपीएफटीला ८ जागा मिळाल्या. त्रिपुरातही काँग्रेसचे खाते उघडलेले नाही.

नागालँडबद्दल बोलायचे झाले तर येथे एनडीपीपीचे सरकार आहे. निफियु रिओ हे येथील मुख्यमंत्री आहेत. हा पक्ष २०१७ मध्ये अस्तित्वात आला. यानंतर एनडीपीपीने २८ जागा जिंकल्या आणि भाजपने १२ जागा जिंकल्या. निवडणुकीत दोन्ही पक्षांनी युती केली. एनडीपीपी, भाजप आणि एनपीपी सरकारमध्ये आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा