रत्नागिरी ५ जानेवारी २०२४ : चिपळूणसाठी २०० कोटींची पाणी पुरवठा योजना लवाकरच मंजूर करणार, असे आश्वासन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. चिपळूण नगर परिषदेच्यावतीने शहरातील पूर्ण झालेल्या विकासकामांचे लोकार्पण व नव्याने सुरू होणाऱ्या अशा ५ कोटी विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते आज झाले. स्व.अण्णासाहेब खेडेकर संकुलात झालेल्या मुख्य कार्यक्रमात पालकमंत्री श्री. सामंत बोलत होते. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, सुरेखा खेराडे, उमेश सकपाळ, मिलिंद कापडी, सचिन कदम, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, माजी नगराध्यक्ष रिहाना बिजले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, मी सहा महिन्यांपूर्वी दौरा केला असता त्यावेळी ज्या ज्या विकासकामांना आपण निधी देऊ असे आश्वासन दिले होते, ती सर्व विकासकामे सहा महिन्यात पूर्ण होऊन उद्घाटन झाले आहे. राज्यातील महायुती सरकार विकासकामांबाबत किती गतिमान आहे, हे यावरून स्पष्ट होते. चिपळूण कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे. सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील उपक्रम, कार्यक्रम राबविण्यासाठी सर्वचजण पक्षभेद विसरून एकत्र येतात अशी चिपळूणची ख्याती महाराष्ट्रभर आहे. अशाचप्रकारे विकासकामांसाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आल्यास विकास खुंटणार नाही. किमान आचारसंहितेपूर्वी तरी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी विकासासाठी एकत्र यावे. तसेच चिपळूण व रत्नागिरी येथे आपण विज्ञान भवन उभारणार आहोत. आमदार श्री. निकम यांनी मागितलेला निधी चिपळूणसाठी देऊ. मुख्याधिकाऱ्यांनी चांगले प्रस्ताव द्यावेत. ते आपण मंजूर करू, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान कार्यक्रमात बोलताना आमदार श्री.निकम म्हणाले, शासनाच्या माध्यमातून चिपळूण शहरातील विकासकामांसाठी आजपर्यंत २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. उर्वरित कामांसाठी पालकमंत्री श्री.सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा. त्यामध्ये प्रामुख्याने वाशिष्ठी, शिव नदीतील गाळ काढणे, शंकरवाडी येथील नलावडा बंधारा बांधणे, तसेच पवन तलाव मैदान उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी निधी द्यावा. पर्यटनदृष्ट्या चिपळूणचे महत्त्व वाढवायचे असल्यास काही ठिकाणी विकासकामे होणे गरजेचे असल्याचे मत निकम यांनी मांडले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर