50 रुपयांचे मोबाइल स्क्रीन गार्ड जिवावर बेतले, कामगाराची चाकूने आणि कोयत्याने केली हत्या..

17

सांगली, २७ जानेवारी २०२५ : 50 रुपयांच्या स्क्रीन गार्डवरून वाद उफाळला आणि तो एका कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. मोबाईल शॉपीत स्क्रीन गार्डच्या किंमतीवरून झालेल्या वादातून चार जणांनी चाकू आणि कोयत्याने हल्ला करत कामगाराचा निर्घृण खून केला. या धक्कादायक घटनेने सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे

खून झालेल्या कामगाराचे नाव विपुल अमृतपुरी गोस्वामी (वय 25) असे असून तो बसस्थानकाजवळील श्री भैरवनाथ मोबाईल शॉपीमध्ये कामाला होता. ही घटना रविवारी, 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता घडली. 100 रुपयांच्या स्क्रीन गार्डसाठी ग्राहकाने 50 रुपयांना सवलत मागितली. सवलत न दिल्याने वाद निर्माण झाला आणि चार आरोपींनी हल्ला केला.

घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घूगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय पोलिस अधिकारी विमला एम आणि पोलिस निरीक्षक संजय मोर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात करत तीन आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी फरार आहे.

या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत कामगार आणि आरोपींच्या पूर्वीच्या संबंधांबाबत तपास सुरू असून हा खून पूर्वनियोजित होता का, याची चौकशी सुरू आहे. सांगली पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे आरोपी ताब्यात आल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

सांगलीतील वर्दळीच्या भागात भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडाने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा