माढा, सोलापूर १६ ऑक्टोबर २०२३ : सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात माढा, पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यातील समाविष्ट गावासाठी, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विविध विकासकामासाठी ९२ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारत नाना पाटील यांनी दिली. माढा मतदारसंघासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार रणजिसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत नाना पाटील, जलतज्ञ अनिल पाटील, बलभीम लोंढे, हरिभाऊ माने आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
माढा विधानसभा मतदारसंघातील नगरविकास योजनेंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण, बंदिस्त गटार आदी कामांसाठी महाळुंग, श्रीपूर नगरपंचायत व माढा नगरपंचायतीसाठी पन्नास कोटी, तांडा वस्ती विकास योजनेतून रस्ते करणे, पाणी शुद्धीकरण केंद्र, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, खडीकरण करणे या कामांसाठी वीस कोटी तसेच जलसंधारण योजनेतून पाझर तलाव दुरुस्तीची कामे करण्यासाठी माढा तालुक्यातील १७ गावे, पंढरपुरातील पाच गावे यासाठी पाच कोटी निधी, आदिवासी विकास योजनेतून रस्ते, खडीकरण, डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी माढ्यातील नऊ गावे, पंढरपुरातील तीन गावे व माळशिरसमधील सात गावांसाठी सहा कोटी सहा लाख, अल्पसंख्याक विकास योजनेतून ईदगाहसमोर कॉक्रिटीकरण करणे, ब्लॉक बसविणे, विद्युतीकरण करणे या कामांसाठी माढा तालुक्यातील तीन गावांसाठी २५ लाख रुपये, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मंदिरासमोरील सभामंडप बांधणे, वाहनतळ उभारणे, पेव्हिंग ब्लॉकसाठी ५० लाख रुपये, पाणंद रस्ते विकास योजनेतून रस्ते खडीकरण, मुरुमीकरण आदींसाठी ५० लाख रुपये, मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, परिसर सुशोभीकरण करणे आदी कामांसाठी चार कोटी रुपये, यामध्ये माढ्यातील १८ गावे, पंढरपुरातील पाच व माळशिरसमधील तीन गावे आहेत. दलित वस्ती विकास योजनेतून काँक्रिटीकरण करणे या कामासाठी तीन कोटी मंजूर झाले असून यात माळशिरस तालुक्यातील १३ गावे, माढा तालुक्यातील ०९ गावे, पंढरपूर तालुक्यातील ११ गावे समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत नाना पाटील यांनी दिली.
माढा विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी आमदार रणजिसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून भरघोस निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल. माढा तालुक्यातील प्रस्तावित कोट्यवधी रुपयांची विकासकामे असून ती सुद्धा लवकरच मंजूर होतील.
-भारत नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भाजप
न्युज अनकट प्रतिनिधी : प्रदीप पाटील