गोल पोस्ट दिवाळी विशेष प्रवाशांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांवर आरटीओचा ‘दिवाळी’ दणका!

प्रवाशांची लूट करणाऱ्या ट्रॅव्हल्सवाल्यांवर आरटीओचा ‘दिवाळी’ दणका!

सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) यावेळी कठोर भूमिका घेतली. दिवाळीच्या निमित्ताने मूळ भाड्यापेक्षा दुप्पट-तिप्पट भाडे आकारून प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि खासगी बसचालकांना ‘आरटीओ’ने चाप लावला.

११ दिवसांत २२९ बसेसवर कारवाई करत, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. आरटीओने १५ ते २६ ऑक्टोबर या ११ दिवसांच्या कालावधीत ही विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत, २२९ दोषी बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून २ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मोठा दंड वसूल करण्यात आला.

प्रवाशांकडून जास्त भाडे आकारणे, वाहनांच्या फिटनेसमध्ये त्रुटी असणे, ‘स्टेज कॅरेज’ नियमांचे उल्लंघन करणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे असलेले अग्निशमन उपकरण (Fire Extinguisher) नसणे अशा गंभीर कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पिंपरी-चिंचवड) राहुल जाधव यांनी या कारवाईची माहिती दिली. नागरिकांची लूट करणाऱ्यांवर भविष्यातही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.

आरटीओच्या नऊ भरारी पथकांनी आपल्या कार्यक्षेत्रात रात्रंदिवस तपासणी करून ही मोहीम यशस्वी केली. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देत, आरटीओने केलेल्या या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version