स्फुर्तीगीताचे दीडशतक
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘वंदे मातरम्’चा नारा देत शेकडो क्रांतिकारकांनी हसत हसत फासावर जाणे पसंत केले. देशाच्य स्वातंत्र्ययुद्धाचे स्फुर्तीगीत म्हणून ज्या गीताचा गौरव केला जातो, त्या एका धर्माशी जोडण्याचा निंद्य प्रकार सुरू झाला. जातीयतेचा रंग देण्यात आला. या गीताच्या ठराविक दोन ओळींचा संकुचित अर्थ लावून ते म्हणण्यास नकार देणाऱ्या काही ठराविक मुस्लिमांना या गीतामागची भावना कळलीच नाही. स्वातंत्र्ययुद्धात ‘वंदे मातरम्’ म्हणत आंदोलन करणाऱ्या, प्रसंगी बलिदान देणाऱ्या अनेक मुस्लिम स्वातंत्र्यसैनिकांचा आपण अवमान करीत आहोत, हे त्यांच्या ध्यानात येत नाही. प्रतिके ही शब्दशः घ्यायची नसतात. मातृभूमीला वंदन करण्यात देव, अल्ला, येशू, बौद्ध अशी कोणतीच देवता कधीच विरोध करणार नाही; परंतु केवळ इतर धर्मियांना विरोध करण्यासाठी राष्ट्रगीताचा दर्जा असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कुणी विरोध करणार असेल, तर ते चुकीचे आहे.
भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांविरोधात क्रांतीचे स्फुल्लिंग पेटवणाऱ्या गीतांत ‘वंदे मातरम्’चा समावेश होतो. या गीताला सात नोव्हेंबरला दीडशतक पूर्ण होणार आहे. या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा आहे. ज्या गीतांत आपल्या देशाचे वैशिष्ट्य सांगितले आहे, ज्यात पारतंत्र्याविरोधात बंड करण्याची ताकद होती, ते गीत म्हणण्यास धर्माचा आधार घेऊन नकार देणे चुकीचे आहे. कोणताही धर्म आपल्या मातृभूमीचे कौतुक करण्यास विरोध करण्याची सूतराम शक्यता नाही. ज्या देशात आपण घडलो, वाढलो, त्या देशाचे गुणगान करण्यात धर्म कसा आडवा येऊ शकतो, याचा सारासार विचार न करता केवळ काही पंक्तीचा संकुचित अर्थ लावून, तसेच ते संस्कृतमध्ये आहे, म्हणून ते गायला नकार देणे हा देशद्रोहीपणा आहे. धार्मिकतेचा रंग देशप्रेमाला देणे चुकीचे आहे. या गीताच्या रचनेला दीडशे वर्ष होत असताना गेल्या २६ जानेवारीची घटना प्रकर्षाने आठवते. बिहारच्या कटिहार जिल्ह्यात ‘वंदे मातरम्’ न गाण्यावरून वाद निर्माण झाला. ही घटना कटिहार जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेत घडली. तिथे अफजल हुसेन नावाच्या एका शिक्षकाने २६ जानेवारी रोजी ‘वंदे मातरम्’ गाण्यास नकार दिला. ‘वंदे मातरम्’ गाण्यास नकार देण्यामागे या शिक्षकाचा तर्क असा होता, की भारताचे राष्ट्रगीत त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरुद्ध आहे. तो अल्लाहची पूजा करतो आणि म्हणून ‘वंदे मातरम्’ गाऊ शकत नाही. शिक्षक म्हणून या माणसाचे काम देशाचे भविष्य उज्ज्वल करणे आहे; परंतु जर त्याला स्वतःला ‘वंदे मातरम्’ गाण्यात अडचण येत असेल, तर तो त्याच्या विद्यार्थ्यांना देशभक्तीची कोणती व्याख्या शिकवेल? आपल्या देशातील अनेक लोकांना हे माहीत नाही, की ‘वंदे मातरम्’ला भारत सरकारने राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली आहे. ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीतापेक्षा कमी आदर दिला जात नाही. जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे आणि ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. दोन्ही गाणी आपल्या राष्ट्राच्या ‘डीएनए’चा भाग आहेत. त्यांना वेगळे किंवा त्यांची तुलना करता येत नाही. २४ जानेवारी १९५० रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत एक विधान केले. ते म्हणाले, की ‘वंदे मातरम्’ या गीताने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ऐतिहासिक भूमिका बजावली, म्हणून ‘वंदे मातरम्’ला ‘जन गण मना’इतकाच सन्मानित केले जाईल आणि ‘वंदे मातरम्’ला जन गण मनाइतकाच दर्जा असेल. या ऐतिहासिक विधानावरून हे स्पष्ट होते, की ‘वंदे मातरम्’ आणि जन गण मन यांना समान आदर आहे. सत्य हे आहे, की स्वातंत्र्याच्या वेळी ‘वंदे मातरम्’चा खूप आदर केला जात होता. तथापि, स्वातंत्र्यानंतर त्याचा आदर कमी झाला.
‘वंदे मातरम्’ हे एक असे स्फुर्तीगीत आहे, जे भारतातील लोकांनी ब्रिटिशांना पराभूत करण्यासाठी म्हटले होते; परंतु हे स्फुर्तीगीत स्वतःच्या देशाच्या राजकारण्यांसमोर हरले. काही लोक या गीताकडे धर्माच्या चष्म्यातून पाहतात. ‘वंदे मातरम्’च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे देशाच्या हिताचे नाही. ज्यांना भारताच्या इतिहासाचे ज्ञान नाही किंवा ज्यांना भारताबद्दल प्रेम नाही, तेच त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात. ‘वंदे मातरम्’चा इतिहास माहीत करून घेतला, तर हृदय आपोआप ‘वंदे मातरम्’बद्दलच्या आदराने भरून जाईल. आपल्या देशात १८५७ च्या युद्धाला भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हटले जाते; परंतु या युद्धाच्या ९४ वर्षे आधीही १७६३ मध्ये बंगालमध्ये संन्यासी बंड झाले होते. हे संन्यासी बंड ब्रिटिशांविरुद्धचे पहिले युद्ध होते. सुमारे ३८ वर्षे बंगाल आणि बिहारच्या विविध भागात संन्याशांनी इंग्रजांशी लढा दिला. या बंडाच्या कथेवर आधारित प्रसिद्ध बंगाली लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ‘आनंद मठ’ नावाची ऐतिहासिक कादंबरी लिहिली. याच कादंबरीत ‘वंदे मातरम्’ हे गीत समाविष्ट होते. ‘वंदे मातरम्’ हे पहिले देशभक्तीपर गीत आहे. ते ब्रिटिशांविरुद्ध उठलेल्या पहिल्या आवाजाचे प्रतीक आहे. त्याचे अस्तित्व नाकारणे हे भारताविरुद्ध बंड करण्यासारखे आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली. तथापि, त्याच्या तीन वर्ष अगोदर १८८२ मध्ये ‘आनंद मठ’ ही कादंबरी प्रकाशित झाली. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ७ नोव्हेंबर १८७६ रोजी बंगालमधील कांताल पाडा गावात ‘वंदे मातरम्’ची रचना केली. १८९६ मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात ‘वंदे मातरम्’ हे गाणे गायले गेले. रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः काँग्रेस अधिवेशनात ते गायले. ‘वंदे मातरम्’ हे गाणे आणि घोषणा आहे, जिने भारताला पुन्हा जागृत केले आणि आधुनिक राष्ट्रवादाचा पाया घातला. १९०५ मध्ये जेव्हा बंगालमधील स्वातंत्र्य चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिशांनी बंगालचे दोन भाग करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा संपूर्ण बंगाल ब्रिटिशांविरुद्ध रस्त्यावर उतरला. त्या वेळी ‘वंदे मातरम्’ हे गाणे क्रांतिकारी भावनेची एकमेव अभिव्यक्ती होती. १६ ऑक्टोबर १९०५ रोजी पूर्व बंगालचे मुख्य सचिव आणि ब्रिटिश अधिकारी पी. सी. लायन यांनी सार्वजनिक ठिकाणी ‘वंदे मातरम्’ गाण्यावर बंदी घालणारी नोटीस जारी केली. त्यानंतर ‘वंदे मातरम्’ची लोकप्रियता देशभर पसरली. १९२३ मध्ये ‘वंदे मातरम्’वरील वाद सुरू झाला, तेव्हा काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना मुहम्मद अली जौहर यांनी ‘इस्लाममध्ये संगीत निषिद्ध आहे’ असे म्हणत त्याचा विरोध केला. या घटनेनंतर तेरा वर्षांनी, १ जुलै १९३९ रोजी महात्मा गांधींनी ‘द हरिजन’ या साप्ताहिक मासिकात ‘वंदे मातरम्’ बद्दल लिहिले, ‘मला आनंद मठबद्दल काहीही माहिती नाही; पण ‘वंदे मातरम्’ मला भुरळ घालते. हे गाणे शुद्ध राष्ट्रीय भावनांनी भरले आहे. ‘वंदे मातरम्’ हे कधीही हिंदू गाणे म्हणून किंवा फक्त हिंदूंसाठीच लिहिले गेले नाही. दुर्दैवाने, आपण एका अतिशय वाईट काळातून जात आहोत… जिथे सोन्यासारखी शुद्ध गोष्ट देखील सामान्य केली जात आहे. विचारात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे, की महात्मा गांधी ज्या वाईट काळाबद्दल बोलत होते, तोच काळ आजही अस्तित्वात आहे.
आपल्या संविधानाच्या मूळ प्रस्तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द नव्हता. हा शब्द नंतर जोडण्यात आला. भारतातील आणीबाणीनंतर, १९७६ मध्ये संविधानातील ४२ वी दुरुस्ती मंजूर करण्यात आली आणि प्रस्तावनेत दोन शब्द जोडले गेले, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी. धर्मनिरपेक्ष हा शब्द ‘सांप्रदायिक’ असा अनुवादित करण्यात आला. त्याचा अर्थ समाजवादी असा होतो. तथापि, नंतर ते धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही हा शब्द वादग्रस्त आहे. धर्मनिरपेक्ष हे एक विशेषण आहे ज्याचा अर्थ धर्माबाबत पक्षपाती नाही असा होतो. आपल्या देशात धर्माच्या नावावर कधीही भेदभाव झाला नाही. शाश्वत संस्कृतीच्या या गुणामुळे आज आपल्या देशात सर्व धर्मांचे लोक शांततेत राहतात. आपल्या देशात, ख्रिश्चन, पारशी, यहुदी आणि मुस्लिम सर्वांना आजच नव्हे, तर शतकानुशतके पूर्ण सुरक्षितता लाभली आहे. हिंदू बहुसंख्य लोकांमुळे आपल्या देशातील अल्पसंख्याक सर्वात आनंदी आणि सुरक्षित आहेत. धर्मनिरपेक्षता हिंदू धर्मात अंतर्निहित आहे. तथापि, धर्मनिरपेक्षतेच्या संवैधानिकतेचा हवाला देऊन भारताच्या मूळ संस्कृतीवर हल्ला करणे देशाच्या सामाजिक संतुलनासाठी चांगले नाही. भारताच्या इतिहासात घोषणांना मोठा संदर्भ आहे. कधीकधी ते संपूर्ण चळवळीचे रूपांतर करतात. इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत, जसे की ‘स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,’ ‘गरिबी हटाव,’ तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘कटेंगे ते बटेंगे’ सारख्या घोषणांनी संपूर्ण निवडणुकीत कसे वर्चस्व गाजवले हे आपण पाहिले. त्याचा निवडणूक निकालावर परिणाम झाला. ‘वंदे मातरम्’चे तसेच आहे. या घोषणेचा केवळ भारताच्या इतिहासावर प्रभाव पाडला नाही, तर स्वातंत्र्यलढ्याची दिशा आणि मार्गदेखील बदलला. अशा या घोषणेला आणि स्फुर्तीगीताला दीडशेव्या वर्षानिमित्त तरी संकुचित भावनेतून न पाहता व्यापक भूमिकेतून पाहण्याची अपेक्षा केली, तर ती वावगी ठरू नये.
न्यूज अनकट प्रतिनिधी: भागा वरखडे
