चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला वगळल्याचे वृत्त ही अफवा: इराण

तेहरान, दि. २१ जुलै २०२०: इराणने भारताला चाबहार जहेदान रेल्वे प्रकारापासून बाहेर काढल्याचे वृत्त काही दिवसापासून चर्चेत होते. मात्र आता इराणने या सर्व चर्चांना लगाम लावत स्पष्टीकरण दिले आहे. इराणचे परिवहन आणि रेल्वे विभागाचे उपमंत्री सईद रसौली यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या वृत्तांमागे कोणता तरी कट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

इराणमध्ये चीनने ४०० अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. त्यानंतर सर्वत्र अशी चर्चा सुरू झाली होती की इराणने भारताला चाबहार पोर्ट जवळ होत असलेल्या रेल्वे प्रकल्पातून बाहेर काढले आहे. नेपाळ, श्रीलंका आणि आता इराण सोबत देखील भारताचे संबंध खराब होत आहेत की काय असा प्रश्न सर्वत्र निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. एवढेच काय तर भारतात यावरून राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुद्धा सुरुवात झाली होती. या सर्वांमध्ये सरकार कडून देखील कोणतेही स्पष्टीकरण समोर आले नव्हते त्यामुळे या वृत्ताला दुजोरा मिळत होता.

भारताने या प्रकल्पासाठी निधी देण्यास उशीर केल्यामुळे इराणने हा प्रकल्प स्वतः पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी चालू होती. द हिंदूने छापलेल्या एका वृत्तामध्ये देखील याचा उल्लेख केला गेला होता. द हिंदू मधील एका वृत्तानंतर सर्वत्र या प्रकल्पाविषयी चर्चा होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवड्यात इराणचे परिवहन व नगरविकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी ६२८ किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचे उद्घाटन केले होते. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानाच्या झारंज सीमेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इराणच्या दौऱ्यावर गेले होते या दौऱ्यादरम्यान या रेल्वे प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात झाल्या होत्या. या प्रकल्पाची एकूण रक्कम १.६ अब्ज डॉलर इतकी होती. इरकॉनचे अभियंतेदेखील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इराणमध्ये गेले होते. परंतू अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताने रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू केले नाही. अमेरिकेने चाबहार बंदरासाठी सवलती दिल्या आहेत पण उपकरण पुरवठादार उपलब्ध नाहीत.

इराण व अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामुळे अमेरिकेने इराणवर प्रतिबंध लादले होते त्यामुळे भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात करणे देखील बंद केले होते. भारताने घेतलेल्या या निर्णयामुळे इराण व भारतामध्ये हळूहळू संबंध खराब होत चालले आहेत की काय असे देखील या वृत्तानंतर जाणवू लागले होते. तर दुसर्‍या बाजूला इराण चीन कडे आकर्षित होत असताना देखील पहावयास मिळत आहे. अमेरिकेच्या प्रतिबंध यामुळे इराणची आर्थिक स्थिती खालावली आहे. ही संधी बघून चीनने देखील इराणमध्ये आता गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घटना नंतर इराणने भारताला या रेल्वे प्रकल्पातून बाहेर काढण्यात आल्याचा वृत्ताला चांगलाच दुजोरा मिळाला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा