पुणे, ३ जानेवारी २०२१: आज सावित्री फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘सावित्री शक्तिपीठ सन्मानाचे’ आयोजन करण्यात आले होते. या वर्षी या सन्मानाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांना गौरविण्यात आले.
आज सावित्री माईंच्या जयंती निमित्ताने समताभूमीत मिळालेला “सावित्री शक्तीपीठ सन्मान” साविञीची लेक म्हणून माझ्या कार्याला प्रेरणा आणि ऊर्जा देणारा आहे. हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा क्षण आहे,” असे मत यावेळी रूपालीताईनीं व्यक्त केले.
आज क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती निमित्ताने, समताभुमी येथे सावित्री शक्तीपीठ, महाराष्ट्र यांच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.
यामध्ये अकरा विधवा महिलांना मंगळसुञ, साडीचोळी व हळदीकुंकूचे वाण देऊन सन्मानित करण्यात आले. पतीनिधनानंतर येणाऱ्या दुःखाला व अडचणींना बाजूला सारून, खंबीरपणे बिकट परिस्थितीत सन्मानाने जगत, समाजालाही दिशा देण्याचे काम करणाऱ्या या महिलांचा सन्मान खऱ्या अर्थाने सावित्री माईचा विचार अंगिकारण्यासारखे आहे.
सावित्री शक्तिपीठाच्या वतीने सन्मानपञ, शाल, श्रीफळ देऊन माझा सत्कार करण्यात आला. सन्मानपञाचे वाचन विकास रासकर यांनी केले.
“मी सावित्रीबाई फुले बोलतेय” हे एकपाञी नाटक मेघना झुझुम यांनी सादर केले, ओव्यांसाठी शांता नेवसे यांनी साथ दिली. राज्यभरातुन अनेक महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या. दशरथ कुळधरण, कमला हिंगणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी दिपक कुदळे, पोपट बोराटे व मान्यवर उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे