नवी दिल्ली,३० जून २०२३ : रशिया-युक्रेन युद्धाला आता दीड वर्षाचा काळ लोटत आला आहे. नुकताच रशियामध्ये अंतर्गत कलह ही पाहायला मिळाला. परंतु अजूनही युद्ध संपण्याची चिन्ह दूर-दूर पर्यंत दिसत नाहीत. या युद्धामुळे जगातील अनेक देश मंदीच्या खाईत अडकले आहेत. अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळली आहे. जगभरात महागाई वाढत चाललीआहे. परंतु या दरम्यान काही तेल कंपन्या मात्र मालामाल होत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या तेल कंपन्यांची कमाई पाहून देवापेक्षा जास्त नफा कमावणारे असे म्हणाले होते.सध्या चालू असलेल्या रशिया-.युक्रेन युद्धामुळे अमेरिकेतील सर्वात मोठी तेल कंपनी एक्सॉनमोबिलचा नफा १५० वर्षाच्या इतिहासातील उच्चस्तरावर स्तरावर पोहोचला आहे.
एक्सॉनमोबिलच नोव्हेंबर २०२२ पर्यंतच प्रॉफिट पाहून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी देवापेक्षा जास्त नफा कमवणारे असे म्हटले होते. एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे. एक्सॉनमोबिलने वर्ष २०२३ मधील पहिल्या तिमाहीचे जानेवारी-मार्च पर्यंतचे आकडे जाहीर केले आहेत. कंपनीच प्रॉफिट अनेक देशांच्या जीडीपीच्या बरोबरीत पोहोचले आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे जगभरातील तेल व्यापारात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. पाश्चिमात्य देशातील कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत. एक्सॉनमोबिल या कंपनीचा जानेवारी ते मार्च २०२३ च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ११.४३ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचला आहे. म्हणजे जवळपास ९३.८२३ कोटी रुपये होतात. वर्षभरापूर्वी याच काळात हाच नफा ५.४८ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास ४४,९८२ कोटी रुपये होता.
याच प्रमाणे शेवरॉन कॉर्पोरेशनच प्रॉफिट २०२३ च्या पहिल्या तिमाहीत ६.६ अब्ज डॉलर आणि शेलच प्रॉफिट ८.७ अब्ज डॉलर होते. बीपीचा निव्वळ नफा या दरम्यान ८.२ अब्ज डॉलर राहीला. ब्रिटनची प्रमुख तेल कंपनी बीपी भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीसोबत मिळून काम करते. युद्ध काळात रिलायन्स इंडस्ट्रीजने रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्तात कच्च्या तेलाची खरेदी केली.जामनगरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची जगातील सर्वात मोठी रिफायनरी आहे. रशियाकडून विकत घेतलेले कच्चे तेल रिफाईन केल्यानंतर युरोपियन देशांना तेलाची सर्वात जास्त निर्यात केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धात पुढे काय होणार? हे भविष्यात समजेल. दोन्ही देशांपैकी कोणाची एकाची सरशी होईल. मागच्या काही वर्षात युरोप आणि अमेरिकेने हस्तक्षेप केलेल्या युद्धांकडे पाहिल्यास खरा खेळ तेलाचा असल्याचे लक्षात येते. इराक युद्ध आणि खाडी युद्धाबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. यात सर्वात जास्त नफा कमावण्यामध्ये तेल कंपन्याच पुढे होत्या. इराक युद्धानंतर त्या देशात स्थिरता आली नसेल, पण अमेरिकन तेल कंपन्या मालामाल झाल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर