Petrol-Diesel Rates, 3 मार्च 2022: गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा (Crude Oil Prices) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवरही परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $110 च्या वर गेली आहे. गेल्या सात वर्षांतील ही सर्वोच्च किंमत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत आज पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर, त्याची किंमत प्रति बॅरल $ 110.23 पर्यंत वाढली. जुलै 2014 नंतर प्रथमच कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $110 वर पोहोचली आहे.
याशिवाय अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या किमतीतही 4.8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याची किंमत सप्टेंबर 2013 पासूनची सर्वोच्च $ 108.41 प्रति बॅरल झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. यूपी, पंजाबसह पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भडकण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.
2021 च्या दिवाळीनंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र याउलट कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. रशियाने युक्रेनवर बॉम्बफेक केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अलीकडेच, कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेल्या होत्या, त्यानंतर आज किंमत प्रति बॅरल 110 डॉलरच्या पुढे गेली आहे.
तेल कंपन्या ठरवतात दर
गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारऐवजी सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत दररोज होणारे बदल लक्षात घेऊन या किमती निश्चित केल्याचा दावा तेल कंपन्यांनी केला आहे. भारतात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. गेल्या वेळी नोव्हेंबरच्या सुरुवातीला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती, त्यानंतर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात 10 आणि 5 रुपयांची कपात करून जनतेला दिलासा दिला. यूपी-बिहारसह जवळपास सर्व राज्यांनीही नंतर व्हॅटचे दर कमी केले होते.
यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर वाढणार भाव?
सध्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. यूपीमध्ये मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. मतदानाचा शेवटचा टप्पा 7 मार्चला असला तरी निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे. किंबहुना विधानसभा निवडणुकीमुळे तेलाच्या किमतीत वाढ होत नसल्याचेही पेट्रोल-डिझेलच्या दरांवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे. तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारानुसार तेलाच्या किमती ठरवतात, असे म्हटले जात असले तरी, गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की, राज्याच्या निवडणुका सुरू असताना पेट्रोल-डिझेलचे दर सहसा वाढत नाहीत. निवडणुकीनंतर पुन्हा भाव बदलू लागतात. अशा स्थितीत निवडणूक निकालानंतर यावेळीही पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे