इंदापूर : एस बी पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आयोजित “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान करण्यात आले होते.
यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रेखाचित्र स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांमध्ये २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. तसेच एकशिव, माळशिरस येथे आयोजित राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेत, मराठी संस्कृती या विषयावर पथनाट्य सादरीकरणात प्रथम क्रमांक मिळवून मराठी संस्कृती व भाषेचा प्रचार व प्रसार करुन जनजागृती करण्यात आली.
या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन त्यांचे अभिनंदन संस्थेचे प्राचार्य डॉ.प्रवीण नेमाडे यांनी केले.
यावेळी डॉ.प्रवीण नेमाडे म्हणाले की, मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे.आज आपण आपल्या भाषेचा म्हणजेच मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करीत आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे,नक्कीच, ह्याबद्दल दुमत नाही. परंतु आपण मराठीची कास सोडावी हे मनाला न पटणारे आहे. मायबोलीतून मूलभूत ज्ञान प्राप्त करता येते आणि संस्कारक्षम मन तयार होते त्यामुळे घरात संवादात मराठीचा वापर करावा.मराठी भाषेचे वैभव जगासमोर मांडताना तिची गोडी जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
तसेच विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.खंडू पवळ यांनी मराठी संस्कृती जोपासण्याचे आवाहन करताना पंधरवड्यानिमीत्त आयोजित उपक्रमांची माहिती सांगितली तसेच आशिया खंडातील सर्वात मोठ पुस्तकांच गाव “भिलार” या ठिकाणी ही भेट दिल्याचा आवर्जून उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी दत्तात्रय कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग सोन्ने
यांनी तर आभार प्रदर्शन पवन डहाळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील , सचिव भाग्यश्री पाटील , विश्वस्त अंकिता पाटील ,सल्लागार डॉ गिरीश देसाई ,प्राचार्य डॉ प्रवीण नेमाडे ,सर्व विभाग प्रमुख,विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ यांचे सहकार्य लाभले.