भोसरी : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर भरधाव वेगाने येणारी एसटी बस धडकली. या अपघातात एसटी बसचा कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात बुधवारी (दि.२०) पहाटे पुणे- नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडला. पहाटेच्या वेळेस दाट धुक्यामुळे हा ट्रक दिसून न आल्यामुळे हा अपघात झाला.असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंबादास दिनकर खेडकर (वय-३२) असे मृत्यू झालेल्या कंडक्टरचे नाव आहे. तर गंगाराम दिनकर सानप असे बस चालकाचे नाव आहे. बस चालकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे आगारातील बस (एम.एच-२०बी.एल-३४२६) साक्रीहुन पुण्याच्या दिशेने निघालेली धुळे आगाराची एसटी बस पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर आली. त्या बसचा वेग एवढा जोरात होता की तिने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकली. त्यावेळी दाट धुके असल्यामुळे हा ट्रक बस चालकाला दिसून आला नाही. त्यामुळे हा अपघात झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.