सभापती निवडणुकीत भाजपला धक्का

चिंचवड : वडगाव नगरपंचायतीमधील विषय समित्यांच्या सभापती निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आले आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.२१) रोजी झालेल्या निवडणुकीत सर्व सहा विषय समित्यांच्या सभापतिपदी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. भाजपला एकही सभापतिपद न मिळाल्याने धक्का बसला. मागच्यावेळी भाजपकडे तीन विषय समित्यांचे सभापतिपद होते.

नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी गुरुवारी नगरपंचायतीत विशेष सभेचे आयोजन केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत सहापैकी चार विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध व दोन विषय समितीच्या निवडणुकीसाठी मतदान झाले.

स्वच्छता वैधक, आरोग्य समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत आघाडीचे राजेंद्र कुडे यांनी भाजपचे दशरथ केगले यांचा एका मताने तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत चंद्रजित वाघमारे यांनी भाजपचे किरण म्हाळसकर यांचा एका मताने पराभव केला.

शिक्षण व क्रीडा समिती सभापतीच्या निवडणुकीत मनसेच्या सायली म्हाळसकर यांच्या अर्जावर सूचक व अनुमोदक समान असल्याने भाजपचे गटनेते दिनेश ढोरे यांनी हरकत घेतली. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांनी ती फेटाळल्याने म्हाळसकर विजयी झाल्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा