सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप

मुंबई, ८ एप्रिल २०२१: अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणाची चौकशी करता करता प्रकरण अनोख्या वळणावर येताना दिसत आहे. प्रथम या प्रकरणी सचिन वाझे याला आरोपी ठरवण्यात आले. त्यानंतर मुंबई चे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप लावले होते. यावरून अनिल देशमुख यांना राजीनामा देखील द्यावा लागला, ही चर्चा संपते ना संपते आता सचिन वाझे यांनीदेखील नवा लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील ३ मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केला आहे.

सचिन वाझे याने लिहिलेले हे पत्र आता एन आय ए कोर्टात दिले जाणार आहे. या पत्रात सचिन वाझे यानी अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत पुढे असे म्हटले आहे की, मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूही वसुली करण्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट दिले होते. दरम्यान, या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने सीबीआय ला दिले आहेत. या प्रकरणात आता NIA बरोबरच आता सीबीआय कडून प्रत्यक्षरित्या तपासाला सुरुवात होणार आहे. इतकच नाही तर संबंधित पत्रावरुन मॅजिस्ट्रेटसमोर सचिन वाझे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरुन वाझे यांनी घुमजाव करु नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

काय आहे सचिन वाझे च्या पत्रात

२०२० मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितपे होते की, मला पुन्हा सेवेत घेण्यास शरद पवार यांचा विरोध आहे. तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितले की ते पवारांचे मन वळवतील आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे २ कोटी रुपयांची मागणी केली. पण एवढी मोठी रक्कम देण्यास मी असमर्थता दर्शवली. त्यावर गृहमंत्र्यांनी मला पुढे ही रक्कम देण्यास सांगितलं.

ऑक्टोबर २०२० मध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांनी मला सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावले होते आणि मुंबई शहरातील १ हजार ६५० बार, रेस्टॉरंट्समधून पैसा गोळा करण्यास सांगितलं होते. मात्र, हे आपल्या क्षमतेच्या बाहेर असल्याचे सांगत आपण त्यास नकार दिला होता.

इतकेच नाही तर सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा