मुंबई : रेल्वेने देशभरातील ५५०० रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा पुरवण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
जानेवारी २०१६ मध्ये मुंबई सेंट्रल स्थानकापासून हा प्रवास सुरु झाला आणि ४६ महिन्यांच्या कालावधीत देशभरात ५५०० स्थानकांवर वायफाय सेवा यशस्वीपणे पुरवण्यात आली.
मोफत वायफाय सेवा देणारे पूर्व मध्य रेल्वे मार्गावरील महुआ मिलन रेल्वे स्थानक ५५०० वे स्थानक बनले आहे.
ऑक्टोबर २०१९ मध्ये सर्व रेल्वे स्थानकांनवर रेलवायर वाय-फाय सेवांमध्ये एकूण १.५ कोटी प्रवाशांनी लॉगिन केले आणि १०२४२ टीबी डेटा वापरला.
या मोफत वायफाय सेवेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील डिजिटल दरी सांधण्यास मदत होईल. विद्यार्थी, विक्रेते, दैनंदिन प्रवासी यांच्यासाठी हे वरदान ठरले आहे.