साडेचारशे तळीरामांवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ ची कारवाई

पुणे: नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या ४६० वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. कारवाई केलेल्यांमध्ये दुचाकी चालकांची संख्या जास्त असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री कोणताही अपघात घडला नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

मद्यपींवर सर्वाधिक कारवाई कोरेगाव पार्क परिसरात कारवाई करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले होते.
मद्यपान करून वाहने चालवू नका, अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या होत्या. ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात ७४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या मोहिमेत ६१ अधिकारी आणि ६४८ कर्मचाऱ्यांची फौज विविध ठिकाणी तैनात करण्यात आली होती. नाकाबंदीच्या ठिकाणी ‘ब्रेथ अॅनालायझर’च्या मदतीने वाहनचालकांची तपासणी केली जात होती.
या कारवाईत मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या ४६० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. पैकी ३१४ दुचाकीचालक असून, १२२ चारचाकीचालक आणि २४ तीनचाकीचालक आहेत. शहरात मद्यपींवर सर्वाधिक कारवाई कोरेगाव पार्क परिसरात कारवाई करण्यात आली. त्यानंतर वानवडी, कोंढवा, सिंहगड रस्ता, वारजे, शिवाजीनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. गुन्हे दाखल झालेल्यांना चारित्र्य पडताळणी आणि नोकरीसाठी अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा