पुरंदर : सध्या वाढदिवस म्हंटले कि, एखाद्या कार्यालयाचे बुकिंग, जेवणाच्या पंक्ती, ओर्केष्ट्रा आणि येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य यानिमित्त लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु समाजातील ज्या घटकांना अद्यापही मुलभूत सुविधा मिळत नाहीत ते घटक मात्र या सर्व गोष्टीपासून कायमच वंचित राहतो. मात्र एवढे सर्व डामडौल करण्याची क्षमता असतानाही सर्वसामान्य नागरिक हे आपल्याच कुटुंबातील घटक आहेत, असे समजून आणि कोणताही डामडौल न करता गावाची स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना साड्या वाटप करून अत्यंत साधेपणाने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वानीच कौतुक केले आहे.
सासवड येथील पुरंदर कॉलेजमधील प्राध्यापक केशव काकडे आणि त्यांच्या पत्नी सुजाता काकडे यांच्या लग्नाचा २९ वा वाढदिवस २९ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. काकडे दांपत्याची कन्या प्रणिता काकडे आणि ओंकार शिंदे यांचा नुकताच विवाह पार पडला.
या विवाहानिमित्त आहेर म्हणून मोठ्या प्रमाणात साड्या मिळाल्या होत्या. वास्तविक पाहता त्यांनी साड्या त्यांचे नातेवाईक किंवा इतर कार्यक्रमाना दिल्या असत्या, परंतु तसे न करता त्यातील चांगल्या आणि दर्जेदार साड्या निवडून काढल्या आणि सासवड नगर पालिकेतील स्वच्छता करणाऱ्या आणि बागकाम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना त्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.
सासवडच्या माजी नगराध्यक्षा आणि गटनेत्या आनंदिकाकी जगताप यांच्या हस्ते या साड्यांचे महिला कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्षा निर्मला जगताप, पुरंदर कॉलेजचे प्राचार्य हनीफ मुजावर, राजाभाऊ जगताप, यशवंत जगताप, माजी उपनगरा ध्यक्ष वामन जगताप, नगरसेवक सुहास लांडगे, संजय गं. जगताप, अजित जगताप, सीमा भोंगळे, माया जगताप, नंदकुमार जगताप, प्रविण भोंडे, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, प्रा. गोविंद हारे, सुरेश झेंडे, उद्योजक सुभाष काकडे, सौ इंदुमती काकडे, ओंकार शिंदे, प्रणिता शिंदे, श्वेता काकडे, अक्षय काकडे, नम्रता काकडे त्याच प्रमाणे नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटनेत्या आनंदिकाकी जगताप यांनी सांगितले कि, स्वच्छता कर्मचारी हे उन, वारा, पाऊस, थंडी याचा विचार न करता वर्षभर संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याचे कार्य करीत असतात. आम्ही नगरपालिकेच्या वतीने सन्मान करतोच, परंतु एखाद्या व्यक्तीने स्वतः पुढाकार घेवून अशा व्यक्तींचा सन्मान केल्याने कर्मचाऱ्यांना खर्या अर्थाने मान सन्मान मिळाल्याचे समाधान मिळते. त्यामुळे प्रा. काकडे यांच्या कुटुंबियांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले.
प्रा. केशव काकडे यांनी सांगितले कि, स्वच्छता कर्मचारी हा समाजाचा मुख्य घटक आहे. त्यांनी अहोरात्र मेहनत करून शहर स्वच्छ ठेवल्यानेच आपण मोकळा श्वास घेतो आणि अशा व्यक्तींचा सन्मान झाला पाहिजे हि भावना मनात ठेवून आपल्या आनंदात त्यानाही सामील करून घ्यावे, यासाठीच हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.