सफरचंद व संत्री घेवून जाणारा ट्रक उलटला

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील वडगावपान शिवारातील विशाल गार्डन शेजारी एका कारचालकाने सफरचंद व संत्री घेवून जाणाऱ्या मालवाहू ट्रकला हुलकावणी दिल्याने हा ट्रक उलटला.
आज (दि. १४) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एकूण तेरा टन पैकी सात टन सफरचंद व दोन टन संत्र्यांचे मोेठे नुकसान झाले आहे. ट्रक चालकही जखमी झाला आहे.
तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मखरुनसिंग पूरणसिंग राजपूत (रा. दसोली सांध्र काठुवक, जम्मू-काश्मीर) हा चालक कंटेनरमधून १३ टन सफरचंद व संत्री दिल्लीहून कोपरगाव मार्गे पुण्याला जात होता.
बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वडगावपान शिवारातील विशाल गार्डन शेजारी हा ट्रक आला असता त्याच दरम्यान अज्ञात कारचालकाने भरधाव वेगात कार चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले व समोरून चालणाऱ्या ट्रकला हुलकावणी दिली. कारचालकाला वाचविण्याच्या नादात मालवाहू ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी ट्रकमधील सर्व सफरचंद व संत्री रस्त्यावर फेकल्या गेले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा