नवी दिल्ली (वृत्त संस्था) : दक्षिण कोरिया येथील जेजू आयलंड येथे पार पडलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धा भारताच्या शरीरसौष्ठव पटूंनी गाजवले. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या आयकर खात्यात असलेल्या सागर कातुर्डेने ७५ किलो वजन गटात सोनेरी यश मिळवित मि.वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्ण जिंकले.
सागरसह महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि वीरेश धोत्रे या दोघांनीही रौप्य जिंकून पदकविजेती कामगिरी केली. भारतासाठी संस्मरणीय ठरलेल्या या स्पर्धेत दहापैकी सात गटात सुवर्ण यश संपादन केले.
जेजू आयलंडवर झालेली ११ वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा भारतासाठी आजवरची सर्वाधिक यशस्वी ठरली. त्यातच महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठवपटूंनी धम्माल केली. सहावेळा भारत श्री तसेच महाराष्ट्र श्री आणि मुंबई श्रीचा बहुमान मिळविणाऱ्या सागर कातुर्डेने ७५ किलो वजनी गटात कमाल केली. त्याने आपल्याच भारताच्या जयप्रकाश आणि सतीशकुमारवर मात करीत सोनेरी यश मिळविले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच यश होय.
भारताच्या यशानिमित्त जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सर्वच खेळाडूंचे कौतुक केले.