दौंड, २९ सप्टेंबर २०२०: दौंड तालुक्यातील राहू पिंपळगाव येथील नापिक जमीन सुपीक करण्यासाठी सायपन पद्धत येथील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. सामुहिक शेतीचा हा यशस्वी प्रयोग येथील प्रगतशील शेतकरी हनुमंत शिंदे, बापू गाडेकर, वसंत मगर व त्यांच्या २२ सहकारी शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे.
सायपन पद्धत करण्यापूर्वी या शेतकऱ्यांचे उसाचे सरासरी उत्पादन तीस टनाच्या जवळपास होते, परंतु सायपन पद्धतीमुळे हे एकरी उत्पादन शंभर टनाच्या जवळपास पोहचणार आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी जिल्ह्यातून शेतकरी भेट देत आहेत. दौंड तालुक्यात पाण्याच्या मोठ्या वापरामुळे जमिनीचा पोत घसरून शेती व्यवसाय अडचणीत येत चालला आहे. त्यासाठी ही पद्धत वरदान ठरणार आहे. दौंड तालुक्यात यापूर्वी कृषी विभागाकडून पाझर चाऱ्या खोदून नापिक जमिनी सुपीक करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु या प्रयत्नांना म्हणावे तसे यश मिळाले नाही. परंतु त्याच प्रमाणात खर्च करून ही नवीन सायपन पद्धत राबविली तर नापिक जमीनीचा पोत सुधारण्यास मदत होणार आहे.
सायपन पद्धत राबविणाऱ्या शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्याने त्यांचे सरासरी उत्पादन घटल्याने आर्थिक परिस्थिती हालाखीची झाली होती, परंतु आता हा प्रश्न सायपन पद्धतीमुळे कायमचा संपुष्टात येऊन या शेतकाऱ्यांची आर्थिक गणिते जुळणार आहेत. हाच आदर्श घेऊन परिसरातील नापिक झालेल्या जमिनी सुपीक करण्यासाठी शेतकरी याचे अनुकरण करून सायपन पद्धतीचा अवलंब करीत आहेत.
याबाबत येथील शेतकरी हनुमंत शिंदे म्हणाले की, दौंड तालुक्यात पाझर जमिनीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. हे क्षेत्र नापिक बनले असून कुठलेच पीक या जमिनीत येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. परंतु सायपन पद्धत राबविली तर या जमिनीचा पोत सुधारून शेतकाऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे. सायपन पद्धत ही कमी खर्चात होत असून शेतकरी घरगुती ही पद्धत राबवून विक्रमी उत्पादन घेऊ शकतो.
अशी आहे सायपन पद्धत
सायपन पद्धत ही पाझर पड जमीन अथवा पाण्याच्या पादुभार्वामुळे कमी निचरा होणाऱ्या जमीनीमध्ये करणे आवश्यक आहे. त्यामध्ये जमीनीच्या उच्चीनुसार जमीनीत इंग्रजी शब्द ‘वाय पीस’ पद्धतीने गरजेनुसार अडीच इंची अथवा तीन इंची पीव्हीसी पाईप टाकून त्याला ग्रँडरने छिद्र पाडले जातात आणि ते पाईप जमिनीत गाडले जातात पुढे हे पाईप ओढ्याला अथवा नदीला सोडल्यास जमिनीतल्या पाण्याचा निचरा होऊन जमीन कोरडी पडते आणि जमिनीचा पोत सुधारून उत्पन्नात वाढ होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव