जळगावात सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको

जळगाव, २४ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी नगर विभागातर्फे टॉवर चौकात आज रास्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी नगर विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नगरातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर उड्डाणपुलावरुन टॉवर चौकाकडे पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मराठा बांधवासह ओबीसी बांधव, मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने एक मराठा लाख मराठा म्हणत सहभागी झाले होते. ही पदयात्रा दुपारी १२ वाजता टॉवर चौकात येऊन धडकली. यावेळी आंदोलकांनी टॉवर चौकात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन सुरू असल्याने चारही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी जवळपास २० मिनीटे वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला.

या आंदोलनात विजय बांदल, गणेश मोजर, शिवाजी थोरवे, रितेश जाधव, गजानन माढरे, भारती महांगडे, गायत्री बांदल, दत्तात्रय बांदल, दीपक गायकवाड, प्रदीप गायकवाड, पांडुरंग शिंदे, शशिकांत पवार, जमील शेख, मजहर पठाण, सुनील बांदल, आनंद गाढवे, जयसिंग शिंदे, नारायण तरटे, राजू सोनार आदी सहभागी झाले होते. उप विभागीय पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी नगर विभागातर्फे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात विविध समाज बांधव सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनाकडे समाजातील इतर दिग्गजांनी पाठ फिरवल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले. केंद्र व राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मनोज जरांगे पाटील यांची नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र राज्य सरकार करत आहे. याचा आम्ही निषेध करतो. संपूर्ण मुस्लीम समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहे असे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण यांनी म्हंटले आहे.

राज्य सरकार आम्हाला वारंवार अश्वासन देऊन आमचा विश्वासघात करत आहे. सगेसोयरे कायदा लागू करा, सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे आणि यापुढेही उभा राहील. रास्ता रोको आंदोलन करत असताना ज्येष्ठ नागरीक, स्कूल बस, रूग्णवाहिका यांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत असे आंदोलक विजय बांदल यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा