गोल पोस्ट गुन्हा साकीनाका घटनेनंतर सरकार कठोर; शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

साकीनाका घटनेनंतर सरकार कठोर; शक्ती कायद्याबाबत गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई, १४ सप्टेंबर २०२१ : राज्यातील महिलांच्या तसेच बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गृह विभागाची आढावा बैठक झाली. या बैठकीत गृहमंत्री वळसे पाटील यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. शक्ती कायद्याचे प्रारूप विधानसभेत मांडण्यात आले आहेत. कायदा परिपूर्ण होण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येत असून या समितीचा अहवाल आगामी हिवाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

“अलीकडच्या काळात राज्यात घडलेल्या घटनामुळे पोलिसांचा वचक आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. ही बाब पोलिस दलाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी पोलीस दलाने अधिक दक्ष व सतर्क राहणे आवश्यक आहे. कोरोना काळात पोलिस यंत्रणावर विशेष ताण आहे हे लक्षात घेतले तरी यंत्रणानीं अधिक सतर्क व कार्य तत्पर रहावे. पोलीस स्थानकात आलेल्या महिलेची तक्रार तत्काळ नोंदवून घेण्यात यावी. या तक्रारीचा तपास, पुरावे जमा करण्यास प्राधान्य द्यावे. अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करावे. अशा न्यायालयीन प्रकऱणांना गती देण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा. महाराष्ट्र पोलिस दल नावारुपाला आलेले दल आहे. हे नाव राखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.”, असं गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सूचना केल्या. “माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी जे काही करता येईल, अशा उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, त्यासाठी पूर्ण पाठबळ देण्यात येईल. यातून महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी जो काही संदेश द्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करा.”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतीलच, पण निराधार, असहाय महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धोरण म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्तपणे प्रयत्न करावे लागतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version