साकीनाका घटना निंदनीय; फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, १२ सप्टेंबर २०२१: ऐन गणेशोत्सवाच्या वातावरणात मुंबईला सुन्न करणारी घटना शुक्रवारी पहाटे साकीनाका परिसरात घडली. एका ३२ वर्षीय महिलेवर टेम्पोचालकाने अमानुष लैंगिक अत्याचार केले. या महिलेचा शनिवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशीदेखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशीदेखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.

विशेष पथक…

याप्रकरणी पोलिसांनी बलात्कार आणि खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच चौकशीसाठी साहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. जलदगतीने तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केले जाईल, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

टेम्पोचालक मोहन चौहान याने साकीनाका खैराणी रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या महिलेला मारहाण केली. त्यानंतर टेम्पोत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिच्या गुप्तांगावर लोखंडी हत्याराने मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला सामूहिक बलात्कार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र नंतर एकाच आरोपीने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा